‘द काश्मीर फाइल्स’नंतर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर इतिहास रचला. १५ ते २० कोटींच्या बजेटमधल्या या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली. वादग्रस्त विषय आणि बेधडक मांडणीमुळे हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती असा गंभीर विषय असल्याने या चित्रपटावर बरीच टीकाही झाली.
या चित्रपटानंतर याचे निर्माते विपुल अमृतलाल शाह, दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा अशाच एका वादग्रस्त विषयावर चित्रपट घेऊन येत आहेत. ‘बस्तर द नक्षल स्टोरी’ हा या त्रिकूटाचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला, डाव्या विचारसरणीमुळे देशाची झालेली वाताहत आणि कम्युनिझम आणि नक्षली लोकांमुळे संपूर्ण देशाचे झालेले आर्थिक सामाजिक नुकसान यावर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘द केरला स्टोरी’प्रमाणेच हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात अडकू शकतो याची शक्यता आहे.
नुकतंच या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री अदा शर्मा यांनी ‘अजित भारती’ या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान निर्माते व दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “या चित्रपटाला एवढं यश मिळेल, प्रसिद्धी मिळेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. जेव्हा मी ही गोष्ट ऐकली तेव्हा मला मनातून वाटलं की हा चित्रपट लोकांसमोर आणणं हे माझं कर्तव्य आहे. ही कथा मला साऱ्या देशासमोर आणावीच लागेल. त्यावेळी कोणताही स्टुडिओ आमच्या मदतीला धावून आला किंवा कोणताही वितरक आमचा चित्रपट घ्यायला तयार होता.”
आणखी वाचा : “हा बॉलिवूडवर अन्याय…”, हिंदी चित्रपटसृष्टीची बाजू घेत अल्लू अर्जुनने केलं मोठं विधान
पुढे ते म्हणाले, “अखेर आम्ही आमचं ऑफिस गहाण ठेवून पैसे जमवले आणि चित्रपट बनवला. जेव्हा मी त्या केरळच्या पीडित मुलींना भेटलो तेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला की जर ही गोष्ट माझ्या बहिणीच्या किंवा मुलीच्या बाबतीत घडली असती तर मी काय केलं असतं? ही सगळी मनातली खदखद,खंत, राग बाहेर येणं आवश्यक होतं. त्यावेळी मी हे ठरवलं की माझं घर जरी विकावं लागलं तरी चालेल पण मी हा चित्रपट लोकांसमोर आणणार.”
जेवढी टीका या चित्रपटावर झाली तितकाच भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांकडून या चित्रपटाला मिळाला. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन, निर्माते विपुल अमृतलाल शाह तसेच यातील मुख्य अभिनेत्री अदा शर्मा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर एकत्र येऊन यातून गेलेल्या मुलींना जगासमोर आणून विरोध करणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर दिलं. चित्रपटाची एवढी हवा होऊनसुद्धा हा चित्रपट ओटीटी प्रदर्शनासाठी झटत होता. गेले ८ महीने हा चित्रपट ओटीटी प्रदर्शनापासून लांब होता, पण आता मात्र हा चित्रपट ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे.