क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा उज्जैनला पोहोचले आहेत. दोघांचाही उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बाबा नीम करौली यांच्या दर्शनाला गेलेले विराट-अनुष्का आता महाकालेश्वरच्या दर्शनाला पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली चांगली कामगिरी करू शकलेला नाही, त्यामुळे तो देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला पोहोचल्याची चर्चा आहे.

‘एएनआय’ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अनुष्का व विराट दोघेही दिसत आहेत. अनुष्काने साडी नेसली आहे आणि डोक्यावर पदर घेऊन ती पूजा करताना दिसत आहे. तर, विराटही धोती परिधान करून कपाळावर चंदन लावून व गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून पूजा करताना दिसतोय. दोघांचाही हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

“आम्ही इथे प्रार्थना करण्यासाठी आलो आहोत आणि महाकालेश्वर मंदिरात चांगले दर्शन घेतले,” असं अभिनेत्री अनुष्का शर्मा यावेळी म्हणाली.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली खूप चांगली कामगिरी करू शकलेला नाही, त्याची बॅट अजूनही शांत आहे. इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण, इथेही तो खेळू शकला नाही. त्याने इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात २२ तर दुसऱ्या डावात १३ धावा केल्या. यापूर्वी दिल्ली आणि नागपूर कसोटीतही त्याची अशीच अवस्था झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा विराट देवाच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. या देवदर्शनानंतर पुन्हा मैदानात उतरल्यावर विराट कशी कामगिरी करतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.