अलीकडेच, विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ची घोषणा केली, तेव्हापासून देशभरात हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. विवेक यांच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. ‘ द काश्मिर फाइल्स’च्या घवघवीत यशानंतर विवेक रंजन अग्निहोत्री आणखी एक अनोखा विषय घेऊन येत असल्याने प्रत्येक भारतीय प्रेक्षकाला उत्सुकता लागली आहे. शिवाय हा विषय कोरोना काळातील लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात असल्याने या विषयाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.

मध्यंतरी विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांनी एक पोस्टर शेअर करत त्यांच्या आगामी चित्रपटांचे नाव ओळखण्यासाठी चाहत्यांना विनंती केली होती. लगोलग त्यांनी या चित्रपटाचं नाव जाहीर केलं असून नुकतंच विवेक यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ हे या चित्रपटाचे नाव कसे ठेवले यामागील विचार शेअर केला आहे. हा चित्रपट वैज्ञानिकांची एक प्रेरणादायी कथा सांगेल ज्यांनी वैद्यकीय पायाभूत सुविधांशिवाय जगातील सर्वात सुरक्षित लस तयार केली. सोशल मीडियावर त्यांनी संशोधनाविषयी बोलताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.

आणखी वाचा : आधी चित्रपटाची ऑस्करवारी, मग त्यावर बंदी; पाकिस्तानी चित्रपट ‘जॉयलँड’वर तिथल्या सरकारची कारवाई

व्हिडिओमध्ये अग्निहोत्री म्हणाले, “कोविडमुळे ‘काश्मिर फाइल्स’ पुढे ढकलला गेला तेव्हा आम्ही सगळेच वैतगलो होतो आणि तेव्हाच मी कोविडविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि याबद्दल बरंच संशोधन केलं. पण जेव्हा भारतात कोविडची लस तयार केली गेली तेव्हा एक विचित्र वातावरण बाहेर बघायला मिळालं. लस कुणी तयार केली याविषयी लोक बरीच मोठमोठी नावं घेतात, पण काही हुशार सामान्य वैज्ञानिकांनी जीवाचं रान करून ही लस बनवली आहे. या कोविड काळात भारताविरुद्ध एक प्रकारचं ‘बायो वॉर’ सुरू केल्याचं म्हंटलं जात होतं. जगातील कित्येक सत्ताधारी देशांच्या मनात होतं की भारताने कोविडवरील लस बनवायला नको म्हणून. या युद्धात आपल्याच देशाचे कित्येक लोकं होते जे इतरांसाठी काम करत होते. अखेर भारतीय लोकांच्या विश्वासामुळे आणि कित्येक वैज्ञानिकांच्या मेहनतीमुळे भारताने या युद्धात सर्वात जलद आणि सुरक्षित अशी कोविडवरील लस तयार करत विजय मिळवला. म्हणून मी या चित्रपटाचं नाव ‘The vaccine war’ ठेवलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट २०२३ रोजी दर्शकांच्या भेटीला सज्ज झाला असून, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे.