Pallavi Joshi Clarify Vivek Agnihotri Marathi Food Controversy : बॉलीवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे. अलीकडे त्यांनी मराठी जेवणाबद्दल केलेल्या एका टिप्पणीमुळे सोशल मीडियावर गदारोळ झाला होता.

एका मुलाखतीत त्यांनी ‘मराठी जेवण म्हणजे गरिबांचं जेवण’ असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर काही मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनीही टीका केली होती. या वक्तव्यानंतर स्वत: विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेल्याचं आणि अर्ध वाक्य उचलून त्यावरूनच गोंधळ घातल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

अशातच आता त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनीसुद्धा तो फक्त नवरा-बायकोमधील एक विनोदी संवाद असल्याचं सांगितलं आहे. सिद्धार्थ कन्ननने पल्लवी जोशी यांना या वादाबाबत विचारलं असता, त्या म्हणाल्या, “खरंतर ही टिप्पणी मीच केली होती, विवेकचा त्याच्याशी काही संबंध नव्हता.”

पुढे त्यांनी स्पष्ट केलं, “काही लोकांकडे खूप फावला वेळ असतो, त्यांना प्रत्येक गोष्टीत खुसपटं काढायला आवडतं. ते नवरा-बायकोत मजेमजेत झालेलं बोलणं होतं. मी Foodie नाहीये. मला नेहमीच हलकं आणि पौष्टिक खाणं आवडतं. वेळेवर जेवते आणि साधं डाळ-भात किंवा डाळ-भाकरी खाते. लोणचं, चटणी असं काही खात नाही, कारण एकतर ते आरोग्यदायी नाहीत आणि दुसरं म्हणजे मला इतका वेळच नसतो.”

त्यांनी हेही सांगितलं की त्यांची खाण्याची सवय विवेकपेक्षा खूप वेगळी आहे. “मी जेवण बनवत असे, तेव्हा विवेक म्हणायचा, ‘हे तुमचं गरीबांचं जेवण मला नकोय!’ कारण त्याला चटणी, लोणचं, पापड असं सगळं भरलेलं ताट आवडायचं. तेव्हा तो फक्त नवरा-बायकोमध्ये झालेला मजेशीर संवाद होता. लोकांनी काय समजून घेतलं देव जाणे! त्याला तर काही लोकांनी नोटीसही पाठवली, की ‘तुम्ही मराठी संस्कृतीचा अपमान केला आहे’. अरे, त्याची बायकोच मराठी आहे ना? जर खरंच काही अपमानास्पद वाटलं असतं, तर मीच आधी रागावले असते.”

पल्लवी जोशी इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे पल्लवी जोशी सांगतात, “पूर्वी एखाद्या बाग, मैदाने किंवा चहाच्या टपऱ्यांवर जे गॉसिप चालायचं, तेच आता सोशल मीडियावर चालतंय. सोशल मीडियावर एकदा काही बोललं की, ते कायमचं तिथं राहातं. लोक ते वाचतात आणि त्या एकाच गोष्टीवरून इतरांबद्दलचं आपलं मत बनवतात. सोशल मीडिया माणसा-माणसांमधील नात्यांवर वाईट परिणाम करत आहे.”