War 2 Box Office Collection Day 1 : बॉलीवूडचा स्टार अभिनेता हृतिक रोशन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘War 2’ चित्रपट १४ ऑगस्टला जगभरात प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत झळकली आहे. ‘War 2’ पहिल्या दिवशी किती कोटींची ओपनिंग करणार याकडे सिनेप्रेमींची लक्ष लागलं होतं. मात्र, रजनीकांत यांच्या ‘कुली’ सिनेमाने हृतिकच्या ‘War 2’ ला जोरदार टक्कर दिली आहे.
‘War 2’ हा चित्रपट स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी हा सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बॉलीवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर एकाच सिनेमात झळकणार असल्याने या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. ‘वॉर २’ ने प्री-सेल्स बुकिंगमधून २०.५७ कोटी कमावले होते. या सिनेमाचं मूळ बजेट जवळपास ४०० कोटी आहे.
War 2 ने पहिल्या दिवशी किती कोटी कमावले?
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘War 2’ ने पहिल्या दिवशी ५२.५ कोटींची कमाई केल्याचं वृत्त ‘सॅकनिल्क’ने दिलं आहे. सिनेमाच्या हिंदी आवृत्तीने २९ कोटी, तेलुगूमध्ये २३.२५ कोटी आणि War 2 च्या तामिळ आवृत्तीने फक्त २५ लाख कमावल्याचं वृत्त समोर आलं आहे. हृतिक आणि ज्युनिअर एनटीआरची जोडी बॉक्स ऑफिसवर जॅकपॉट ठरेल असा अंदाज अनेकांचा होता.
मात्र, रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाला या तुलनेत अभूतपूर्व यश मिळालं आहे. ‘कुली’ने पहिल्या दिवशी ६५ कोटींची कमाई केली आहे.
War 2 प्रेक्षकांना कसा वाटला?
War 2 बद्दल प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहे. बहुतांश सिनेप्रेमींनी सिनेमा पहिल्यावर कथानकाबद्दल नाराजी व्यक्ती केली आहे. तर, काहींनी हृतिक रोशन आणि ज्युनिआर एनटीआर या कॉम्बोचा नीट वापर केला नाही असंही प्रतिक्रियांमध्ये म्हटलं आहे.
एक युजर लिहितो, चित्रपट सुरुवातीला छान वाटतो पण, त्यानंतर कथा हातातून निसटते.
तर, दुसरा युजर म्हणतो, लोकप्रिय स्टार्सचा परफेक्ट कॉम्बो वाया घालवला आहे. यामुळेच प्रेक्षक असमाधानी होऊन बाहेर पडत आहेत.
काही युजर्सनी कियारा अडवाणीला सिनेमात काहीच स्क्रीन टाइम न दिल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
याउलट हृतिकच्या काही चाहत्यांना War 2 खूपच आवडला आहे. आता येत्या काही दिवसांत हा सिनेमा किती कोटींची कमाई करणार? आपलं मूळ बजेट वसूल करणार का? याकडे सिनेप्रेमींचं लक्ष असेल.