War 2 Star Hrithik Roshan’s 5 Week Transformation : हृतिक रोशन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘वॉर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेता गेले कित्येक दिवस चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने स्वत:वर विशेष मेहनत घेतली होती.
अभिनेत्याने अवघ्या काही दिवसांतच ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं. ‘डीएनए’च्या वृत्तानुसार त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दल सांगितलं आहे. यामध्ये त्याने त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये “Mission accomplished” असं लिहिलं आणि आता तो विश्रांती घेणार असल्याचं सांगितलं.
५ आठवड्यांत केलं कमाल ट्रान्सफॉर्मेशन
अभिनेता पुढे म्हणाला, “सर्वात कठीण गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या प्रसंगांना, आपल्या प्रिय व्यक्तींना आणि जास्तीच्या कामाला नकार देणं.” त्याने अगदी साध्या पण शिस्तबद्ध गोष्टींचाही उल्लेख केला, जसं की रात्री ९ वाजता झोपायला जाणं. या पोस्टमधून त्याने केलेलं ट्रान्सफॉर्मेशन हे अनेक त्याग आणि समजूतदार निर्णयांचा परिणाम असल्याचं समजतं. त्याने हे ट्रान्सफॉर्मेशन अवघ्या पाच आठवड्यात केलं असल्याचं म्हटलं आहे.
हृतिक रोशनने त्याचा प्रशिक्षक व मार्गदर्शक क्रिस गॅथिन, कोच स्वप्नील हजारे आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांचे आभार मानले. त्यांनी त्याला यासाठी पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांच्या सहकार्यामुळे हे ट्रान्सफॉर्मेशन शक्य झाल्याचं त्याने सांगितलं आहे. हृतिक रोशनने असंही म्हटलं की, हा शारीरिक बदल त्याच्या चित्रपटातील भूमिकेसाठी होता.
‘वॉर २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवासांपासून या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. यामध्ये हृतिक रोशनसह दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर व बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकणार आहेत.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ चित्रपट येत्या १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू व तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘कुली’ चित्रपटसुद्धा १४ ऑगस्टलाच प्रदर्शित होणार आहे.