गुन्हेगारी विश्वात ‘बिकिनी किलर’ या नावाने कुख्यात असलेला फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे निर्देश नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. वयाच्या आधारावर त्याला सोडण्यात आले असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. दोन अमेरिकी पर्यटकांच्या हत्येच्या आरोपाखाली चार्ल्सला २००३ मध्ये नेपाळमध्ये अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्यावर भारतासह थायलंड आणि तुर्कीमधील २० पेक्षा जास्त महिलांची हत्या केल्याचा आरोप आहे. चार्ल्सची सुटका होणार यामुळे तो सध्या चर्चेत आहे.

चार्ल्सच्या आयुष्यावर एक चित्रपट आणि एक वेबसीरिजदेखील बनली आहे. त्याच्या आयुष्यावर बेतलेला ‘मैं और चार्ल्स’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा याने चार्ल्सची भूमिका साकारली होती. यामध्ये त्याच्याबरोबर रिचा चड्ढा ही देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

आणखी वाचा : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा; ७७० हून अधिक चित्रपटांत काम केलेल्या कैकला सत्यनारायण यांचे निधन

रणदीप चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी जोरदार तयारी करतो हे आपण अनुभवलं आहेच. म्हणूनच या चित्रपटादरम्यान रणदीपने तुरुंगात जाऊन खुद्द चार्ल्स शोभराजची भेटसुद्धा घेतली होती. एकूणच किलर चार्ल्स शोभराजची भेट घेणं एवढं सोप्पंही नव्हतं त्यासाठी दिग्दर्शकाला बऱ्याच प्रक्रियेतून जावं लागलं. अखेर परवानगी मिळाली आणि रणदीप हुड्डा याने चार्ल्सची भेट घेतलीच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये रणदीपने या भेटीबद्दल खुलासा केला होता. जेव्हा रणदीप चार्ल्सला भेटायला गेला तेव्हा त्याने चार्ल्ससारखाच पोशाख केला होता. रणदीपला पाहून चार्ल्स स्तब्ध होता. दोघे भेटल्यावर बराच वेळ शांतता होती, पण नंतर मात्र चार्ल्सने रणदीपला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान चार्ल्सने रणदीपला एक प्रश्न विचारला की, “या भूमिकेसाठी तुम्ही नेमकी कशी तयारी केली?” यावर रणदीप उत्तरला की, “मी यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे, तुमचे बरेच जुने व्हिडिओजदेखील मी पाहिले त्यामुळे मला बरीच मदत झाली.” ‘मैं और चार्ल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी अयशस्वी ठरला असला तरी रणदीप हुड्डाच्या अभिनयाची लोकांनी प्रशंसा केली.