When Dharmendra said I lost all hope: पुरस्कार, सन्मान सोहळे यामुळे केलेल्या कामाची पावती मिळत असते. कला, क्रीडा, विज्ञान आणि विविध क्षेत्रांमध्ये गुणवंतांचे पुरस्कार देऊन वेळोवेळी कौतुक केले जाते.

बॉलीवूडमध्येदेखील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. अनेक अशा चित्रपटांत काम केले, जे प्रचंड गाजले. धर्मेंद्र हे अशा कलाकारांपैकी एक आहेत.

धर्मेंद्र यांनी फक्त गंभीर भूमिका साकारल्या नाहीत. त्यांनी रोमँटिक, विनोदी आणि शांत अशा भूमिकादेखील साकारल्या. मात्र, त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नाही.

धर्मेंद्र यांनीदेखील अनेकदा ही खंत बोलून दाखवली. १९६० मध्ये ‘दिल भी तेरा, हम भी तेरे’ या चित्रपटासाठी त्यांना प्रमुख भूमिकेत कास्ट करण्यात आले, त्यावेळी त्यांना फक्त ५१ रुपये मानधन दिले होते.

धर्मेंद्र हे ६० च्या दशकाच्या शेवटी स्टार बनले. परंतु, ‘फूल और पत्थर’, ‘शोले’, ‘प्रतिज्ञा’, ‘सत्यकाम’, ‘मेरा गाव मेरा देश’ आणि ‘चुपके चुपके’सारखे ३०० हून अधिक हिट चित्रपटांत त्यांनी काम केले. मात्र, धर्मेंद्र यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला बेस्ट टॅलेंट हा फक्त एकच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

अनेक चांगल्या चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले नसल्याबद्दल त्यांनी वक्तव्य केले होते. तसेच, दरवर्षी पार पडणाऱ्या सोहळ्यात पुरस्कार मिळेल या आशेने ते काय करत असत, याबद्दलही खुलासा केला होता.

“या आशेने मी एक…”

४२ वा फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळा १९९७ ला पार पडला. त्यावेळी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. पुरस्कार मिळाल्यानंतर धर्मेंद्र म्हणालेले, “मला काम करायला सुरुवात होऊन ३७ वर्षे झाली आहेत. दरवर्षी मला पुरस्कार मिळेल या आशेने मी एक नवीन सूट शिवत असे. त्याला मॅचिंग टाय शोधत असे. पण, पुरस्कार कधीच मिळाला नाही.”

“मी ६० च्या दशकात ‘सत्यकाम’मध्ये काम केले. ‘अनुपमा’, ‘फूल और पत्थर’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. पण, मला पुरस्कार कधीच मिळाला नाही. त्यानंतर मी सूट शिवून घेणे बंद केले. जर पुरस्कार सोहळ्यात बोलावलं तर असाच जाईन. आज ३७ वर्षांनंतर मला ही ट्रॉफी मिळाली आहे. मात्र, या ट्रॉफीमध्ये मी गेल्या काही वर्षांतील १५ ट्रॉफी पहात आहे, ज्या मिळायला पाहिजे होत्या.”

धर्मेंद्र यांनी अनेक मुलाखतींमध्ये असेही म्हटले की, लोकांचं जे प्रेम आहे ते धूळ खात बसणाऱ्या ट्रॉफीपेक्षा खूप जास्त महत्त्वाचे आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांना बॉलीवूडचे ही-मॅन म्हणूनही ओळखले जाते.