करिश्मा कपूरने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन व जया बच्चन यांचा मुलगा, अभिनेता अभिषेक बच्चनशी साखरपुडा केला होता. करिश्मा अनेकदा बच्चन कुटुंबाबरोबर कार्यक्रमांना हजेरी लावायची. इतकंच नाही तर जया यांनी एका कार्यक्रमात करिश्माचा उल्लेख ‘भावी सून’ असा केला होता. करिश्मा व अभिषेक पाच वर्षे एकत्र होते आणि ते लवकरच लग्न करणार अशा चर्चा होत्या, पण त्याचदरम्यान त्यांचा साखरपुडा मोडल्याची बातमी आली होती.
अभिषेक व करिश्माचा साखरपुडा मोडल्यावर विविध अफवा पसरत होत्या, पण बच्चन व कपूर कुटुंबाने लग्न मोडण्यमागाचं कारण कधीच समोर येऊ दिलं नाही. पण करिश्माने साखरपुडा मोडल्यानंतरचा काळ खूपच वेदनादायी होता, असं म्हटलं होतं. “कोणत्याही मुलीने अशा प्रसंगातून जावं असं वाटत नाही,” असं ती म्हणाली होती.
२००३ मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत, तिने नंतर लाइमलाइटपासून दूर जाण्याबद्दलही सांगितलं होतं. “हे सगळं मी जाणीवपूर्वक केलं होतं. मी माघार घेतली होती. मी स्वतःला सर्वांपासून दूर केलं. मला माझ्या दुःखाबद्दल सार्वजनिकपणे बोलायचं नव्हतं. त्यामुळे मी गप्प राहणं पसंत केलं. मी कमी बोलणारी महिला आहे,” असं करिश्मा म्हणाली होती.
“या वर्षाची सुरुवात माझ्यासाठी खूप वाईट झाली होती. कोणत्याही मुलीने अशा प्रसंगातून जावं असं मला वाटत नाही. मला हा त्रास सहन करावा लागला. मला वाटतं की या सर्वातून बाहेर पडायला वेळ हाच एकमेव पर्याय आहे. मी खूप काही सहन केले असलं तरी, जे काही घडलंय ते मी स्वीकारले आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की, जे काही नशिबात आहे ते घडणारच आहे. या सर्व समस्यांना सामोरं जाण्यासाठी मी भावनिकदृष्ट्या तयार नव्हते,” असं करिश्मा म्हणाली होती.

करिश्माची आई बबिता कपूर आणि बच्चन कुटुंबातील मतभेदांमुळे हा साखरपुडा मोडला, अशा अफवा पसरल्या होत्या. त्या कठीण काळात कुटुंबाने भावनिकदृष्ट्या स्थिर राहण्यास मदत केली, असं करिश्माने म्हटलं होतं. “जर माझे आई-वडील (बबिता आणि रणधीर कपूर), बहीण (करीना कपूर), माझी आजी (आजी कृष्णा राज कपूर), माझ्या दोन्ही आत्या (रिमा जैन आणि रितू नंदा) आणि माझे जवळचे मित्र नसते तर मी माझ्या या दुःखातून बाहेर पडू शकले नसते,” असं करिश्मा म्हणाली होती.
करिश्मा कपूरने अभिषेकबरोबर साखरपुडा मोडल्यावर काही महिन्यातच उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं. पण काही वर्षांनी ते विभक्त झाले. करिश्माचा एक्स पती संजय कपूरचं जून २०२५ मध्ये निधन झालं. करिश्मा तिची मुलं समायरा व कियानचा एकटीच सांभाळ करते.