Reena Roy Sonakshi Sinha Look: ट्विंकल खन्ना व रवीना टंडन एकमेकींसारख्या दिसतात, असं २००० च्या दशकात बऱ्याच जणांना वाटायचं. या दोघींबद्दल अनेकांचा गोंधळ उडायचा. तसेच झरीन खान कतरिना कैफसारखी दिसते, तर स्नेहा उल्लाल ही ऐश्वर्या रायसारखी दिसते, असं तुम्ही ऐकलं असेल. असंच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या बाबतीतही म्हटलं जातं. सोनाक्षी सिन्हा ही ज्येष्ठ अभिनेत्री रीना रॉय यांच्यासारखी दिसते, अशी चर्चा होते.
रीना रॉय आता सिनेसृष्टीत सक्रिय नसल्या तरी त्यांनी ७० आणि ८० च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे केले आणि प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. रीना रॉय चित्रपटांबरोबरच त्यांच्या लव्ह लाईफमुळेही त्याकाळी खूप चर्चेत राहिल्या होती. रीना रॉय व शत्रुघ्न सिन्हा यांचं अफेअर होतं. ७ वर्षांचं नातं असूनही शत्रुघ्न सिन्हा यांनी रीनाला सोडून पूनमशी लग्न केलं होतं. लग्नानंतरही रीनाच्या संपर्कात राहिल्याची कबुली खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली होती.
शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नीचं नाव पूनम सिन्हा असून त्यांना लव्ह आणि कुश ही दोन मुलं व सोनाक्षी ही मुलगी आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबरचं नातं संपल्यावर रीना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी झाली. नंतर रीना व मोहसिन यांच्या नात्यात दुरावा आला आणि घटस्फोटानंतर रीना मुलीला घेऊन भारतातच राहिल्या. काही वर्षांनी सोनाक्षी फिल्म इंडस्ट्रीत आली. पारंपरिक वेषातील सोनाक्षीला पाहून अनेकांना रीना रॉय यांची आठवण झाली. सोनाक्षी ही तिच्या वडिलांची एक्स गर्लफ्रेंड रीना रॉय यांच्यासारखी दिसते, असं म्हटलं गेलं.
सोनाक्षी सिन्हाबद्दल काय म्हणाल्या होत्या रीना रॉय?
सोनाक्षी दिसायला हुबेहुब रीना यांच्यासारखी दिसते, याबाबत एकदा खुद्द रीना रॉय यांना विचारण्यात आलं होतं. “सोनाक्षी माझ्यासारखी दिसते, हा निव्वळ योगायोग आहे, कधी कधी असं घडतं. अभिनेत्री जितेंद्र यांची आई आणि माझी आई सारख्याच दिसत असल्याने त्यांनाही जुळ्या बहिणी म्हटलं जायचं,” असं रीना रॉय एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
दरम्यान, रीना रॉय यां पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानबरोबरचं लग्न फार काळ टिकलं नव्हतं. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव सनम खान आहे. तर, शत्रुघ्न सिन्हा यांची एकुलती एक मुलगी सोनाक्षी हिने २०२४ मध्ये झहीर इक्बालशी लग्न केलं.