कलाकार म्हटलं की. स्ट्रगल हे आलेच. त्यात जर एखाद्या कलाकाराकडे अभिनयाचा कोणताही वारसा नसेल, तर त्याच्यासाठी हा प्रवास जास्त कठीण होतो. पण तरीसुद्धा इंडस्ट्रीत कोणतीच ओळख नसतानाही जिद्द व चिकाटीने काम करीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अनेक कलाकार इंडस्ट्रीत आहेत. अशा बऱ्याच कलाकारांच्या खडतर प्रवासमय गोष्टी आपण ऐकत असतो. उदरनिर्वाह करायला म्हणून काही कलाकार अभिनयाव्यतिरिक्त इतर कामे केल्याचेही सांगताना दिसतात.

अशातच अभिनेता विजय देवरकोंडानेदेखील जुन्या आठवणींना उजाळा देत त्याचा खडतर प्रवास सांगितला आहे. विजय देवरकोंडा तेलुगू इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. परंतु, त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नसल्याचे त्याने म्हटलं आहे. ‘जी.क्यू’ ला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा करीत म्हटले होते, “महाविद्यालयात रंगभूमीवर काम करीत असताना अभिनयाची आवड निर्माण झाली. तिथे तुम्हाला स्टेजवर अभिनय करण्याची संधी मिळण्याआधी बॅक स्टेजवरील इतर बरीच कामं करावी लागतात. मी सुद्धा बॅक स्टेजला तिकिटं विकली होती.”

पुढे याबाबत बोलताना त्याने सांगितले, “इंडस्ट्रीत काम मिळवणं मला खूप कठीण गेलं. यादरम्यान मी अनेक ऑडिशन्स दिल्या. असंख्य वेळा मला नाकारलं गेलं. माझा नवीन पॉलिशेट्टी नावाचा मित्र होता. ज्याच्याबरोबर मी कुठे ऑडिशन आहे, आधी दिलेल्या ऑडिशनंतर काही उत्तर आलं का याबाबत चर्चा करीत असे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जवळपास दोन-तीन वर्षं मी चित्रपटांमध्ये फक्त लहानसहान रोल केलेत”.

विजयने इंडस्ट्रीत प्रवेश करताना दुसरा प्लॅन तयार ठेवला होता, असे सांगितले आहे. त्याने ठरवलं होतं की, वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत इंडस्ट्रीत काहीच करता आलं नाही, तर तो दुसऱ्या क्षेत्रात काम करील. परंतु, त्याने कधीच हार मानली नाही. यात त्याने असेही म्हटले आहे की, “बऱ्याचदा मी काही भूमिका नाकारल्याही आहेत. कारण मी कायम मोठ्या संधीच्या शोधात होतो. माझा स्वत:वर तेवढा विश्वास होता. तेव्हा लोक मला तुला कधीच मोठी संधी मिळणार नाही, असं म्हणायचे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विजय देवरकोंडाने ‘येवडे सुब्रह्मण्यम’ या चित्रपटात सहायक अभिनेत्याची भूमिका केली होती. त्यामुळे तो पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर तो ‘वर्ल्ड फेमस लव्हर’, ‘सामराज्य’, ‘द फॅमिली स्टार’, ‘खूशी’, ‘लायगर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकला. तर विजयने त्याच्या अभिनयशैलीने अनेकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे आता त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. विजय लवकरच ‘किंग्डम’ या चित्रपटात झळकणार आहे. येत्या ३० मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.