Deepika Padukone ex boyfriend Muzammil Ibrahim Career: अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडची सध्या खूप चर्चा होत आहे. मुझम्मिल इब्राहिम असं त्याचं नाव असून तो मॉडेल व अभिनेता आहे. दीपिका पादुकोणबरोबर दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच त्यावेळी दीपिका संघर्ष करत असताना मी स्टार होतो आणि मीच दीपिकाबरोबर ब्रेकअप केलं होतं, असंही मुझम्मिलने म्हटलं आहे. तर दीपिकाचा हा एक्स बॉयफ्रेंड नेमका कोण आहे? काय करतो? ते जाणून घेऊयात.

कोण आहे मुझम्मिल इब्राहिम?

मुझम्मिल इब्राहिमचा जन्म श्रीनगर, काश्मीर येथे २५ ऑगस्ट १९८६ रोजी झाला. तो मॉडेलिंग करून नंतर अभिनेता झाला. तो २००३ मध्ये ‘ग्लॅडरग्स मॅनहंट इंडिया’ ही स्पर्धा जिंकून ‘मिस्टर इंडिया’ ठरला होता. तेव्हा तो दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात मॅकेनिकल इंजिनिअरींग शिकत होता.

२००४ मध्ये काश्मीर सोडून मुंबईला आलं मुझम्मिलचं कुटुंब

मुझम्मिल इब्राहिमच्या कुटुंबाने दहशतवादामुळे २००४ साली काश्मिर सोडलं आणि मुंबईला स्थायिक झाले. इथे त्याने मॉडेलिंगमध्ये करिअर सुरू केलं. याच दरम्यान त्याची दीपिका पादुकोणशी भेट झाली आणि त्यांनी दोन वर्ष एकमेकांना डेट केलं.

मुझम्मिल इब्राहिमला मिळालेला शौर्य पुरस्कार

मुझम्मिल इब्राहिम आठ वर्षांचा असताना त्याला राष्ट्रपतींकडून ‘जीवन रक्षा पदक’ शौर्य पुरस्कार १९९४ मिळाला होता. त्याने स्विमिंग पूलमध्ये बुडणाऱ्या एका मुलाला वाचवलं होतं. इतकंच नाही तर १९ वर्षांनंतर त्याने गोव्यात समुद्रात बुडणाऱ्या ६० वर्षीय महिलेचे प्राणही वाचवले होते, त्यासाठी त्याला २००९ मध्ये ‘गॉडफ्रे फिलिप्स नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड’ देण्यात आला होता.

स्विमिंग व मॉडेलिंगमधील पुरस्कार

मुझम्मिल इब्राहिम हा दोन वेळा नॅशनल लेव्हल स्विमिंग चॅम्पियन राहिला आहे. तसेच त्याने मॉडेलिंगमध्येही अनेक अवॉर्ड्स जिंकले आहेत. त्याला GQ ने बेस्ट मेल मॉडल निवडलं होतं, तसेच त्याने एकदा टाइम्स टॉप मॉडेलचा किताब देखील जिंकला आहे.

२००७ मध्ये केलेलं पदार्पण

मुझम्मिल इब्राहिमने पूजा भट्ट दिग्दर्शित ‘धोखा’ चित्रपटातून २००७ मध्ये बॉलीवूड पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील मुझम्मिलच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं, पण चित्रपट फ्लॉप झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुझम्मिलचं करिअर

पदार्पणानंतर मुझम्मिलचं करिअर फार चांगलं राहिलं नाही. तो २००९ मध्ये ‘हॉर्न ओके प्‍लीज’ चित्रपटात झळकला होता. नंतर त्याने २०१२ साली ‘विल यू मॅरी मी?’ हा चित्रपट केला. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी तो २०२० मध्ये केके मेननबरोबर ‘स्‍पेशल ऑप्‍स’ सीरिजमध्ये झळकला होता. तसेच मुझम्मिलने लकी अलीचा म्युझिक व्हिडीओ ‘कभी ऐसा लगता है…’ मध्ये काम केलं होतं. तसेच ‘तेरी याद जब आती है’ व ‘परदेस‍िया’ गाण्यातील व्हिडीओतही तो झळकला होता.