Nimrat Kaur Says People Are Unsettled In Marriages: बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौर ही तिच्या हटके भूमिकांसाठी ओळखली जाते. अनेकदा ती तिच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असते. आता अभिनेत्री निम्रत कौरने एका मुलाखतीत तिच्यावर घरच्यांकडून लग्न करण्याचा दबाव होता, असे वक्तव्य केले आहे.
त्याकाळात मला बऱ्याचदा विचारले जायचे की…
निम्रत कौरने ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री म्हणाली, “मी चित्रपटसृष्टीत काम करीत होते. माझ्या कुटुंबीयांना वाटत होते की, मी माझा छंद जपत आहे. त्यानंतर मी लग्न करेन आणि संसारात रमेन. जेव्हा मी इरफान खान यांच्याबरोबर ‘लंचबॉक्स’ या चित्रपटात काम केले. तेव्हा माझ्या घरच्यांनी माझ्या करिअरला गांभीर्याने घेतले. त्याआधी मी लग्न करावे, असेच त्यांना वाटत होते. इरफान खान यांच्याबरोबर काम केल्यानंतर त्यांना खात्री पटली की, मी या क्षेत्रात काम करू शकते.”
निम्रत कौर तिच्या संघर्षाच्या काळाबद्दल म्हणाली, “मी ६-७ वर्षं अभिनय क्षेत्रात काम करत होते. त्यावेळी मी जाहिरातीत काम करीत होते. त्यावेळी मला चेकने पैसे मिळायचे. त्यावेळी मला माहीत नसायचं की, माझा पुढचा पगार कोणत्या कामातून येणार आहे. त्या काळात मला बऱ्याचदा विचारले जायचे की, तू तुझं हे काम सुरू ठेवणार आहेस का? माझ्या कामाकडे मी छंद जोपासत आहे, अशा नजरेनं बघितलं जायचं. मी मुंबईत राहायचे त्याकडे या दृष्टिकोनातून पाहिलं जायचं की, काही दिवस तिला मजा करू दे. मग ती परत येईल.”
लग्नाबाबत निम्रत कौर म्हणाली की, लग्नाबाबत विचार करण्यासाठी मला माझा वेळ हवा आहे. सध्या मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करीत आहे. आयुष्यात स्थिर होण्यासाठी तुम्हाला लग्न करण्याची गरज नाही. मला वाटतं की, लग्न झालेले लोक सगळ्यात जास्त अस्थिर असतात. बहुतेक लोक असे असतात की, जे स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांच्या आयुष्यात धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. असे लोक जेव्हा इतरांना समाजाने घालून दिलेले नियम मोडताना पाहतात, तेव्हा ते त्यांच्यावर स्वत:च्या अटी लादतात”, असे म्हणत निम्रत कौरने तिच्यावर लग्न करण्यासाठी घरच्यांकडून दबाव होता, असा खुलासा केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन व निम्रत कौर एकमेकांना डेट करीत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. ऐश्वर्या व अभिषेक यांच्या नात्यात निम्रत कौरमुळे दुरावा असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, ऐश्वर्या व अभिषेक यांच्यातील नाते सुरळीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री निम्रत कौर ही ‘दसवी’, ‘स्काय फोर्स’, ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’, ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटांत दिसली आहे. आता आगामी काळात ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.