‘गरिबांचा अमिताभ बच्चन’ म्हणून ज्यांच्या चित्रपटांना बऱ्याचदा हिणवलं गेलं त्या मिथुन चक्रवर्ती यांचे भारतातच नाही तर परदेशातही खूप चाहते आहेत. बॉलिवूडमधला ८० ते ९० हा काळ मिथुन यांनी चांगलाच गाजवला आहे. त्यांच्या त्या काळातील चित्रपटांची लोक आज खिल्ली उडवतात, पण त्याच चित्रपटांमुळे मिथुन चक्रवर्ती टिकून आहेत. मिथुन चित्रपटसृष्टीत टिकू शकले ते केवळ त्यांच्या मेहनतीच्या जोरावर.

याच मेहनतीबद्दल त्यांनी नुकतंच एका कार्यक्रमाच्या मंचावर खुलासा केला आहे. ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमाच्या एका विशेष भागात मिथुन चक्रवर्ती यांनी हजेरी लावली आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाच्या काही आठवणींना उजाळा दिला. शिवाय याच मंचावर त्यांना त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिक बद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. आपल्या जीवनावर बायोपिक बनू नये अशी इच्छा मिथुन यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

आणखी वाचा : ‘आरआरआर २’ बद्दल दिग्दर्शक राजामौली यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “माझे वडील…”

यामागील कारण सांगताना मिथुन यांनी बऱ्याच घटनांचे दाखले दिले, चित्रपटसृष्टीत काम करताना रंगावरून त्यांची बऱ्याचदा खिल्ली उडवली गेली होती, शिवाय बरेच दिवस मिथुन यांना रिकाम्या पोटी झोपावं लागलं होतं. इतकंच नाही तर कधी कधी मिथुन यांच्याकडे झोपायलाही जागा नव्हती, कित्येक रात्री त्यांनी फुटपाथवर काढल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यावर बेतलेला बायोपिक प्रेरणा न देता लोकांना आणखी नैराश्यात ढकलू शकतो असं कारण देत त्यांनी त्यांच्या आयुष्यावर बायोपिक काढू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिथुन चक्रवर्ती हे यावर्षीच्या सर्वात हीट अशा ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटात झळकले. हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला तसंच मिथुन यांच्या कामाचंही कौतुक झालं. आता मिथुनच्या आगामी चित्रपटाबद्दल सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे. याचं नाव अजून ठरलं नसलं तरी याचा फर्स्ट लूक नुकताचा प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात मिथुन बरोबर ८० चं दशक गाजवणारे सनी देओल, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ हे सुपरस्टारही झळकणार आहेत.