Zeenat Aman Opened up on Marriage: ९० च्या दशकातील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक म्हणून झीनत अमान यांची ओळख आहे. झीनत अमान यांनी एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता पुन्हा एकदा लवकरच त्या ‘द रॉयल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

झीनत अमान यांचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. तसेच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. त्या सोशल मीडियावरील अनेक कलाकारांचे, त्यांच्या चित्रपटांचे तसेच शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनांचे किस्से सांगतात. अशातच झीनत अमान यांचे एक जुने वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य केले होते.

मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन हे लग्न केले…

झीनत यांनी १९८५ साली मजहर खान यांच्याबरोबर आईच्या विरोधात जाऊन लग्न केले. सिंगापूरमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. याबाबत झीनत अमान म्हणालेल्या, “मी आईच्या मनाविरुद्ध मजहरबरोबर लग्नगाठ बांधली. तेव्हा ती नाराज झाली होती. पण, माझ्या मुलाच्या जन्मानंतर तिची नाराजी दूर झाली. त्यानंतर हे लग्न करून मी चूक केल्याची मला जाणीव झाली. मात्र, मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन हे लग्न केले होते. त्यामुळे मी या लग्न टिकवण्याचा निर्णय घेतला. मजहरसाठीसुद्धा हे नाते अनुकूल नव्हते. लग्नाच्या पहिल्या वर्षापासूनच कठीण काळ होता. कारण-मी गरोदर होते. त्यावेळी मझहर तिथे नव्हता. त्याचदरम्यान, स्टारडस्टमध्ये , मजहर आणि एका मुलीचे अफेअर असल्याचे एक मोठे आर्टिकल आले होते. हेच वास्तव होते.”

“माझ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर मी त्या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण, मी विचार केला की माझ्या मुलाला एक संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे मी माझा निर्णय बदलला. मी फक्त थांबलेच नाही तर आमचे लग्न टिकावे म्हणून मी खूप प्रयत्नही केले. जेव्हा माझ्या लहान मुलाचा जन्म झाला, तेव्हा मी कामावर परतण्याचा निर्णय घेतला. पण, त्या दरम्यानच मजहर खूप आजारी पडला. तो बरा व्हावा यासाठी मी पाच वर्षे प्रयत्न करत होते. तो कठीण काळ होता. मजहर कालांतराने बरा झाला पण त्याला औषधांची सवय झाली. त्यानंतर किडनी निकामी होऊन त्याचा मृत्यू झाला.”

मजहर खान यांच्या आजारपणाबाबत झीनत म्हणाल्या होत्या, “मझहर बरा व्हावा, यासाठी मी जी शक्य असेल ती गोष्ट केली होती. आम्ही मुंबईच्या प्रत्येक दवाखान्यात गेलो होतो. त्याला इंजेक्शन कशी द्यायची, ड्रेसिंग कसे करायचे,हे मी शिकले होते. परदेशात जाऊन सर्वोत्तम डॉक्टर शोधले आणि उपचार घेतले. पण, जेव्हा या सगळ्या गोष्टी संपल्या, त्यावेळी माझ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला होता. मी नैराश्यात जाण्याच्या स्थितीत होते.”

मजहर खान ज्या प्रमाणात औषधे घेत असत, त्यामुळे झीनत यांनी त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. झीनच अमान म्हणाल्या होत्या, “तो दिवसाला ७ पेनकिलरच्या गोळ्या खात असे. त्यामुळे मी त्याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याची किडनी निकामी झाली. जेव्हा मी त्याच्यापासून वेगळी झाले, तेव्हादेखील मला त्याची काळजी वाटत असे. मी त्याच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल माझ्या मनात कोणताही अपराधीपणा नाही. कारण- मला माहित आहे की मी जितक्या प्रामाणिकपणाने राहिले, तितकं ९९ टक्के कोणतीही महिला राहू शकली नसती.”

दरम्यान, ‘द रॉयल’मधून अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.