scorecardresearch

‘तिची हत्या झालीय, हाच आदेश ऐकायचा का?’ जिया खानच्या आईला मुंबई उच्च न्यायलयाने फटकारले

“माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आली आहे.”

‘तिची हत्या झालीय, हाच आदेश ऐकायचा का?’ जिया खानच्या आईला मुंबई उच्च न्यायलयाने फटकारले

मॉडेल आणि अभिनेत्री जिया खानने अगदी कमी काळाच्या करिअरमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी तिने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ३ जून २०१३ साली जियाने तिच्या जुहूमधील राहत्या घरी आत्महत्या केली. जिया खानच्या आत्महत्येनंतर देखील बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघालं होतं. जिया खानचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. आता या प्रकरणाला जवळपास ९ वर्षे उलटली आहे. मात्र अद्याप जिया खानच्या मृत्यूचं गूढ उलगडलेलं नाही. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायलयाने जिया खानची आई राबिया खान यांना चांगलेच फटकारले आहे.

जिया खानची आई राबिया खान या जाणूनबुजून हे प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न करत आहे. जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने निष्पक्ष आणि सखोल तपास केला आहे. मात्र तिची आई राबिया खान वारंवार ही हत्या असल्याचे सांगत खटला टाळण्याचा आणि त्यात विलंब करण्याचा प्रयत्न केला आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
आणखी वाचा : अमेय वाघ आणि सुमीत राघवनच्या वादावर अखेर पडदा, कारण आले समोर

जिया खानच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) अंतर्गत सुरू आहे. या प्रकरणी जिया खानचा प्रियकर सूरज पांचोली याच्यावर ३ जून २०१३ रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. जियाची हत्या झाल्याचा दावा राबिया खान यांनी केला आहे. जिया खानची आई राबिया खानने अमेरिकन तपास संस्था एफबीआयकडून याप्रकरणाची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी केली होती. त्या प्रकरणी न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्यायमूर्ती एम. एन जाधव यांच्या खंडपीठाने १२ सप्टेंबरला सुनावणी केली. यावेळी आदेश देताना उच्च न्यायालयाने राबिया खानला फटकारले आहे. या आदेशाची प्रत आता समोर आली आहे.

मुंबई उच्च न्यायलयाने नेमकं काय म्हटलं?

सीबीआयने प्रत्येक कानाकोपऱ्यातून या प्रकरणाची सखोल तपासणी केली आहे. मात्र हे प्रकरण आत्महत्येचे नसून हत्या असल्याचा निष्कर्ष काढला आहे. मात्र या प्रकरणी याचिकाकर्त्या (राबिया खान) यांचे वारंवार म्हणणे आहे की, माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. यामुळे या खटल्याच्या निकालाला विलंब होत आहे. राबिया खान ज्या प्रकारे विविध याचिका दाखल करत आहेत, त्यावरुन असे वाटते की जियाचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या आहे, हेच आदेश तिला कोर्टाने द्यावेत अशी तिची इच्छा आहे. मात्र हा असा विचार आणि दृष्टिकोन कायद्याच्या योग्य प्रक्रियेत अडथळा निर्माण करतो, असे खंडपीठाने म्हणणं आहे.

आणखी वाचा : “केमोमुळे माझे केस गेले होते अन्…” महेश मांजरेकरांनी सांगितला ‘तो’ अनुभव

याचिकाकर्त्याच्या या वागणुकीमुळे ट्रायल कोर्टात सुरु असलेल्या या प्रकरणाला विनाकारण विलंब होत आहे. पीडितेचा मृत्यू ही आत्महत्या नसल्याचा तपास पूर्ण न करता न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल द्यावा, अशी याचिकाकर्त्यांची इच्छा आहे. तर प्रथमदर्शनी असे दिसते की सीबीआय पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करत आहे.

पुढील तपासासाठी मुदतवाढ देता येणार नाही – हायकोर्ट

सीबीआयने या प्रकरणाच्या तपासाअंती सर्व गोष्टी न्यायलयासमोर सादर केल्या आहेत. वैद्यकीय पुरावे आणि घटनास्थळावरून जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे, प्रत्येक कोनातून, आरोपीचे वर्तन आणि घटनेचे कारण या सर्व बाबी विचारात घेतल्याचे सीबीआयने सर्व तपशील नमूद केले आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान हे प्रकरण हत्येचे आहे का, याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी प्रथमदर्शनी ही हत्या नाही असे सांगण्यात आले आहे.

पोलीस किंवा सीबीआयने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी कोणताही दोष आढळत नाही. सीबीआयनेही हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे आम्ही सीबीआयच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. तसेच, पुढील तपासासाठी मुदतवाढ देता येणार नाही. आम्ही आमच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्राबाहेर जाऊ शकत नाही आणि FBI ला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या