बॉलिवूड चित्रपट ही जणू प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. आजवर असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. अगदी तिकीटबारीवर त्यांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. यामध्ये ‘पद्मावत’, ‘गली बॉय’, ‘कबीर सिंग’ असे अनेक चित्रपट आहेत जे लोकप्रिय ठरले. उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय, योग्य दिग्दर्शन यामुळे हे चित्रपट गाजले. सहाजिकचं कोणत्याही कलाकाराला त्याच्या चित्रपटाचं कौतुक होत असले तर आनंदचं असेल. विशेष म्हणजे यंदा २०१९ हे वर्ष बॉलिवूडमधील काही कलाकारांसाठी खास ठरलं. त्यांच्या चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसचं गाजवलं नाही. तर या कलाकारांची एक वेगळी ओळखही निर्माण करुन दिली. चला तर पाहुयात २०१९ हे वर्ष गाजविणारे कलाकार.
१. अक्षय कुमार-
खिलाडी कुमार या नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. उत्तम अभिनय आणि साहसदृश्यांसाठी खासकरुन ओळखल्या जाणाऱ्या अक्षयचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत असतो. मग तो केसरी असो किंवा पॅडमॅन. अक्षयसाठी यंदाचं वर्षही खास ठरलं. २०१९ मध्ये त्याचे एका मागून एक असे बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. केवळ प्रदर्शितच झाले नाही तर त्यांनी तिकीटबारीवर उत्कृष्ट कामगिरीही केली. केसरी’, ‘मिशन मंगल’ आणि अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल 4’. या तिन्ही ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. ‘हाऊसफुल4’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १९७.६८ कोटींची कमाई केली. तर ‘केसरी’ आणि ‘मिशन मंगल’ या चित्रपटांनी अनुक्रमे १५१. ८७ कोटी रुपये आणि १९२.६७ कोटींची बॉक्स कमाई केली. त्यामुळे २०१९ मध्ये अक्षय कुमारच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एकूण ५४२.२२ कोटींची कमाई केली.
२. हृतिक रोशन –
जबरदस्त अॅक्शन आणि अफलातून डान्स याचं उत्तम समीकरण असलेला अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. यावर्षी अभिनेता हृतिक रोशनने प्रेक्षकांना चांगल्या चित्रपटांची मेजवाणीच दिली होती. त्याचे ‘सुपर ३०’ आणि ‘वॉर’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘सुपर ३०’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४७ कोटींची कमाई केली. तर ‘वॉर’ या अॅक्शनपटाने २९१.९७ कोटींची कमाई केली. त्यामुळे हृतिक रोशनच्या चित्रपटांनी या वर्षामध्ये एकूण ४३८.९७ कोटींची कमाई केली.
३. शाहिद कपूर –
बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेला चित्रपट म्हणजे कबीर सिंग. अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा रिमेक असलेल्या या चित्रपटामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. कबीर सिंग या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७६.३४ कोटींची कमाई केली असून हा चित्रपट शाहिदच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला आहे.
४.आयुषमान खुराना-
अभिनेता आयुष्मान खुरानासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं ठरलं. या वर्षामध्ये त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘आर्टिकल १५’, ‘ड्रिम गर्ल’, आणि ‘बाला’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६५.१७ कोटींची कमाई केली. तर ‘ड्रिम गर्ल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३९. ३१ कोटींची कमाई केली. तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘बाला’ या चित्रपटाने ५ दिवसात ५९.१७ कोटींची कमाई केली आहे.
५. विकी कौशल –
कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे विकी कौशल. ‘उरी :द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्याला बेस्ट अॅक्टरचा नॅशनल अवॉर्डही मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २४४ कोटींची कमाई केली.
६. सलमान खान –
बहुतेक वेळा ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शनाला प्राधान्य देणाऱ्या सलमान खानसाठी यंदाचं वर्ष खास ठरलं. या वर्षी त्याचा भारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याने बॉक्स ऑफिसवर १९७.३४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफने स्क्रीन शेअर केली आहे.