बॉलीवूड दिग्दर्शक, निर्माता प्रकाश झा यांच्या निर्मिती अंतर्गत बनलेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग सेन्सॉर बोर्डासाठी गेल्या महिन्यात ठेवण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव हिने केले आहे. या स्क्रिनिंगनंतर केवळ हा चित्रपट स्त्रीप्रधान असल्याने यास प्रमाणपत्र देण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट स्त्रीप्रधान आहे. या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यासाठी बोर्डाने अनेक कारणे दिली आहेत. यात सामान्य आयुष्यापेक्षा कितीतरी अधिक, अवास्तव अशा कल्पना रंगवलेल्या आहेत. तसेच, यात विवादास्पद प्रणयदृश्य, शिवीगाळ, ऑडिओ पॉर्नोग्राफी आणि समाजाच्या काही अतिसंवेदनशील भागाचा संदर्भ आहे. यामुळे 1(a), 2(vii), 2(ix), 2(x), 2(xi), 2(xii) and 3(i) या मार्गदर्शन सूचनांतर्गत या चित्रपटास प्रमाणपत्र नाकारण्यात येत असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर झा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या लंडन येथे असलेल्या झा यांनी मुंबई मिररला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,  खरे तर एक देश म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यास आपणास प्रोत्साहन द्यायला हवे. पण सेन्सॉर बोर्डाने याच्या उलट पाऊल उचलले आहे. गुंतागुंतीच्या मुद्यांवर आधारित चित्रपट बनवणा-या निर्मात्यांना मागे ओढण्याचा हा प्रकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या स्त्रीप्रधान चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शहा, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यात एक महिला सामाजिक रुढीवादी बेडी तोडून पित्तृसत्ताक समाजाला आव्हान देते. माझ्या मते याच कारणामुळे ते चित्रपटाला प्रमाणपत्र देत नाही आहेत. या चित्रपटाची दिग्दर्शक असल्याने मी या चित्रपटाचे समर्थन करते आणि त्यासाठी मी शेवटपर्यंत लढेन, असे दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव हिने म्हटले आहे. दरम्यान, ‘लिपस्टिक अन्डर माय बुरखा’ चित्रटाला मुंबई चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑक्सफॅम पुरस्कार मिळाला आहे. तसेच, इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात यास द स्पिरिट ऑफ आशिया प्राइज हा पुरस्कार मिळाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbfc denies certification to prakash jhas lipstick under my burkha for it is lady oriented
First published on: 23-02-2017 at 17:33 IST