स्वप्नील घंगाळे
‘मानसिक ताण दूर करण्यासाठी आधी औषधे घेतली जायची आता मिम्स पाहिली जातात,’ असं मजेत अनेकजण म्हणतात. वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर मिम्सच्या माध्यमातून ट्रोल करणे आणि ते व्हायरल करण्याचे प्रमाण भरपूर वाढले आहेत. खास करून सेलिब्रिटीजवर निशाणा साधणाऱ्या नेटकऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतानाच दिसते आहे. अनेकदा सेलिब्रिटींनी आम्हीही मिम्सचा आनंद घेतो, असं मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र, आता इतरांनी केलेल्या या मिम्सवर चांगलं-वाईट अशा पध्दतीने व्यक्त होण्यापलीकडे सेलिब्रिटी मंडळी पोहोचली आहेत. अनेक बडे कलाकार सध्या उघडपणे आपापल्या समाजमाध्यमांवरून वेगवेगळ्या पध्दतीने आणि तितक्याच वेगळ्या कारणांसाठी मिम्स शेअर करताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये अगदी घरगुती भांडणापासून ते मित्रांची टिंगल करण्यापर्यंतच्या मजेदार पोस्ट सेलिब्रिटीजने समाजमाध्यमांवर मिम्सच्या माध्यमातून शेअर केले आहेत. एखाद्या पोस्टला किंवा कमेंटला सतत शब्दांत उत्तरे देण्यापेक्षा मिम्सचा वापर करून उत्तरं दिली जातात. सेलिब्रिटीजमधला आपापसांतला हा मिम्स संवाद आता नेटक ऱ्यांसाठीही करमणुकीचा विषय ठरला आहे. एरव्हीही समाजमाध्यमांवर सातत्याने कार्यरत असणाऱ्या मंडळींमध्ये रितेश देशमुख हे नाव आवर्जून घेतलं जातं. बॉलीवूडमधील आदर्श जोडपं म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्याकडे पाहिलं जातं. पण बायकोशी झालेलं गोड भांडण रितेशने नुकतंच ट्विटरवरून मिम शेअर करत जगासमोर आणलं. रितेशने ट्विटरवर पोस्ट केलेला एक मिम पाहून या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलंय असा प्रश्न चाहत्यांनाही पडलाय. ‘प्रत्येक चिडलेल्या महिलेमागे एक पुरुष असतो, ज्याला त्याच्याकडून नेमकी काय चूक झाली याचीच कल्पना नसते,’ अशा अर्थाचं एक मिम रितेशने ट्वीट केलं. विशेष म्हणजे त्याने पत्नी जेनेलियाला यात टॅग केलं. रितेशच्या या ट्वीटवर ‘वहिनी काय झालं?’, वगैरे अशा मजेदार कमेंटसही आल्या. त्यानंतर लगेच जेनेलियाने रितेशला यावर उत्तर देत आपणही ‘शेरास सव्वा शेर’ असल्याचे दाखवून दिले. ‘माझा नवरा काय बोलतोय याकडे मी सर्वसामान्यपणे लक्ष देत नाही. पण जेव्हा देते तेव्हा तो चुकीचाच असतो,’ अशी ओळ लिहिलेला मिम जेनेलियाने शेअर करत त्यात रितेशला टॅग केलं आहे.
दरम्यान, या गोड भांडणाबरोबरच अभिनेता अक्षय कुमारनेही सहअभिनेत्याच्या एका भावनिक ट्वीटला मिमच्या माध्यमातून उत्तर देत आपण पडद्यावर आणि पडद्यामागच्या आयुष्यातही तितकेच मजेशीर असल्याचे दाखवून दिले आहे. ‘हाऊ सफुल ४’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर या सिनेमात अक्षयबरोबर काम केलेल्या चंकी पांडेने अक्षयसोबतचा आपला फोटो पोस्ट केला. यामध्ये चंकीने ‘३३ वर्षांमध्ये अक्षयबरोबर चार सिनेमे केले त्यात खूप साऱ्या आठवणी कायमच्या लक्षात राहतील,’ असं अक्षयला टॅग करत म्हटलं होतं. यावर अक्षयने त्याच्या ‘हेराफेरी’ या लोकप्रिय सिनेमामधील ‘५० रुपया काट ओव्हर अॅक्टिंग का’ हा संवाद असणारे स्वत:चेच मिम शेअर केले. या मिमच्या माध्यमातून अक्षयला चंकी उगाच भावनिक झाला असून तो ही गोष्ट अति मोठी करून सांगतो आहे, असं म्हणायचं होतं. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही ‘कौन बनेगा करोडपती’मधील रामायणाच्या प्रश्नावरून तिला मिम्सच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले. आतापर्यंत केवळ शब्दांनी वार करणारी ही मंडळी वाद असो वा गंमत दोन्हींसाठी मिम्सचाच आधार घेताना दिसते आहे.
अशाप्रकारे मिम्सबद्दल कलाकारांनी उघडपणे बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही गेल्या वर्षी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अभिनेत्री विद्या बालन सहभागी झाली होती. त्यावेळी तिने अमिताभ यांना ‘केबीसी’संदर्भातील मिम्स दाखवून खदखदून हसवले होते. अनेक कलाकार हे वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये आमच्यावरील मिम्स पाहून आम्हालाही भरपूर हसू येते, असं सांगतात. बाबुजी मिम्सवर ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथ, भारताचे राष्ट्रपती कोण? या प्रश्नाला चुकीचं उत्तर देणारी आलिया भट या सगळ्यांनीच आपण स्वत:वरील मिम्सचा आनंद घेतो, असं सांगितलं होतं. तर एकंदरीत मिम्सचे वेड हे सामान्यांपुरते राहिले नसून मिम्सने आपल्या आवडत्या कलाकारांनाही वेड लावलंय असं म्हणता येईल.