सेन्सॉर बोर्डाने सोनाक्षी सिन्हाच्या ‘नूर’ या आगामी सिनेमातील दोन शब्दांवर कात्री फिरवली आहे. बोर्डाच्या मते, सिनेमातील ‘दलित’ आणि ‘सेक्स टॉय’ हे दोन शब्द काढून टाकले पाहिजेत. याशिवाय सिनेमात दलितांशी निगडीत काही दृश्यही दाखवण्यात आली आहेत, ती दृश्येही काढून टाकण्याचा सल्ला सेन्सॉरने सिनेमाच्या दिग्दर्शकांना दिला आहे. आता सेन्सॉरने सिनेमात दोष दाखवल्यानंतर निर्माते तरी काय करणार, शेवटी हे दोन्ही शब्द ‘म्यूट’ करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. जेव्हाही सिनेमात ‘दलित’ आणि ‘सेक्स टॉय’ या शब्दांचा उपयोग केला जाईल तेव्हा त्या आवाज बंद करण्यात येईल. सेन्सॉर बोर्डाने ‘सेक्स टॉय’ या शब्दाला प्रतिशब्द म्हणून ‘अडल्ट साइट’ या शब्दाचा वापर करायला सांगितले आहे.
सोनाक्षीचा ‘नूर’ प्रदर्शित व्हायला आता काही दिवसच राहिले आहेत. येत्या २१ एप्रिलला सुनिल सिप्पी दिग्दर्शित ‘नूर’ सर्वांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे आतापर्यंत दोन ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. त्यात पहिल्या ट्रेलरमध्ये सोनाक्षी आयुष्याबद्दल तक्रार करतानाच दिसते. तिचं आयुष्य किती कंटाळवाणं आहे, त्यात काही नाविन्य नाही याबद्दलच ती इतरांना सांगताना दिसते. तर दुसऱ्या ट्रेलरमध्ये ध्येय मिळालेली ती एका बातमीची माहिती मिळवण्याकरता पळताना दिसते. एका घोटाळ्यामागचे सत्य बाहेर काढण्यासाठी ती धडपडताना दिसते. या सिनेमाची सर्व गाणी टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आली आहेत.