सेन्सॉर बोर्डाकडून तांत्रिक बदलांचे कारण; चित्तोडगड किल्ल्यावर पर्यटकांना बंदी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पद्मावती’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक बदलांचे कारण देत चित्रपट पुन्हा निर्मात्यांकडे पाठविला असल्याचे कळते. यामुळे चित्रपटाचा प्रदर्शनाचा १ डिसेंबरचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर ही अफवा असून चित्रपट ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

चित्रपटाविरोधात संपूर्ण राजस्थान व देशाच्या विविध भागांत वाद निर्माण केला जात आहे. यातच आता निदर्शकांनी चित्तोडगड किल्ल्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी केली आहे. या किल्ल्यावर पद्मावतीचा महाल आहे.

चित्तोडगडचे पोलीस अधीक्षक प्रशांत कुमार खमसेरा यांनी सांगितले, की हा किल्ला हे राजस्थानातील वारसा ठिकाण असून ते अधिकृतपणे बंद करण्यात आलेले नाही. निदर्शकांनी या किल्ल्यावर प्रवेश बंद केल्याचे कळवले आहे, पण आम्ही तेथे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. सर्व समाज संघटन व जौहर स्मृती संस्थानचे सदस्य उमेद सिंह यांनी सांगितले, की ‘पद्मावती’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी आठ दिवस पडान पोल येथे धरणे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे चित्तोडगड किल्ला पर्यटकांसाठी आजपासून बंद करण्यात आला आहे. ‘पद्मावती’ चित्रपटात दीपिका पदुकोण हिने दरबारात जे नृत्य केल्याचे दाखवले आहे तो प्रकार आक्षेपार्ह आहे असे त्यांचे म्हणणे आहे. कर्णी सेनेने म्हटले आहे, की संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांचे विकृतिकरण केले आहे. यात दीपिका पदुकोण, शाहीद कपूर व रणवीर सिंह यांच्या भूमिका आहेत.

‘पॅलेस ऑन व्हील्स’

दरम्यान, पॅलेस ऑन व्हील्सच्या कार्यक्रमात कुठलाही बदल केलेला नसून, ही गाडी चित्तोडगड भागात जाईल असे राजस्थान पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार बोराड यांनी सांगितले. मार्चमध्येही चित्रीकरणावेळी रजपूत राणी पद्मावतीच्या महालात लावलेले तीन आरसे चार ते पाच जणांनी फोडून टाकले होते.

दीपिकाची सुरक्षा वाढविली

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला रामायणातील शूर्पणखेची आठवण देत नाक कापण्याची धमकी कर्णी सेनेकडून देण्यात आली असून, मुंबई पोलिसांनी दीपिका व दिग्दर्शक भन्साळी यांची सुरक्षा मुंबईत वाढवली आहे.

‘दशक्रिया’ विरोधातील याचिका फेटाळली

औरंगाबाद : ‘दशक्रिया’ या चित्रपटातील अनेक संवाद, उल्लेख हे मानहानिकारक, भावना दुखावणारे, संदर्भहीन असल्याचा आक्षेप घेणारी आणि चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे  न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांनी शुक्रवारी फेटाळून लावली.

पठण येथील पुरोहित समीर शुक्ल, सोहम पोहेकर, समीर धर्माधिकारी तसेच संतोष छडीदार, गोवर्धन छडीदार यांनी अ‍ॅड. श्रीकांत अदवंत यांच्यामार्फत खंडपीठात याचिका सादर केली होती. आजच्या सुनावणीत अ‍ॅड. अदवंत यांनी विविध मुद्दे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचा संदर्भ दिला. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर खंडपीठाने आपल्या आदेशात, सर्वोच्च न्यायालयाने १६ नोव्हेंबर २०१७ रोजी अरिवद केजरीवाल यांच्यावरील लघुपटाच्या बंदीविरोधातील याचिकेवरील निर्णयाचा आधार घेत याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ शहरातील सत्यम थिएटरमध्ये शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. तत्पूर्वी पैठण येथील पुरोहितांच्या म्हणण्याला पाठिंबा देण्यासाठी काही कार्यकर्ते चित्रपटगृहाजवळ आले. काही वेळाने चित्रपटाच्या समर्थनार्थ मराठा संघटना मैदानात उतरल्या. ‘दशक्रिया’चा खेळ काही वेळ बंद पडला. मात्र, तो नंतर प्रेक्षकांना दाखविण्यात आल्याचे सत्यम चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

काँग्रेस-भाजपातही वाद

पद्मावती चित्रपटावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. सर्व राजांनी इंग्रजांसमोर गुडघे टेकले होते का? या काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केलेल्या टिप्पणीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राजपूत नेत्यांचे नाव घेत त्यांनाच प्रश्न विचारा, असे प्रत्युत्तर दिले आहे. ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह आणि अमरिंदर सिंह यांची नावे त्यांनी घेतली. यावरून थरूर कात्रीत सापडले. आपण कोणत्याही राजपूत घराण्याविरोधात नसल्याचा खुलासा त्यांना करावा लागला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Censor board returns padmavati to makers due to technical issues
First published on: 18-11-2017 at 02:24 IST