ऐन दिवाळीच्या मुहूर्तावरच कलर्स वाहिनीवरील ‘चक्रवर्ती अशोका सम्राट’ या मालिकेचे २०० भाग पूर्ण झाले. आणि सेटवर दिवाळीत जल्लोष झाला. ‘बालगंधर्व’, ‘अजिंठा’, ‘जोधा-अकबर’ यांसारखे ऐतिहासिक चित्रपट जिथे साकारले गेले त्या कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्येच ‘अशोका’चाही सेट असल्याने मालिकेच्या सेटवर दोनशे भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आनंदीआनंदाचा माहौल होता. दिवाळीच्या निमित्ताने रांगोळी, फुलबाजा आणि गोडधोड पदार्थाच्या संगतीने हा आनंद कलाकारांनी साजरा केला.
या मालिकेमध्ये समीर धर्माधिकारी, मनोज कोलटकर, पल्लवी सुभाष सारखे मराठी कलाकार काम करत आहेत. मराठीतील सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा समीर ‘अशोका’च्या निमित्ताने ऐतिहासिक मालिकांमध्ये चांगलाच रमला आहे. त्याला ‘अशोका’ मालिकेबद्दल विचारले असता दोनशे भागांचा आकडा पूर्ण करणे हे नक्कीच आनंदाचे आहे. परंतु, ऐतिहासिक भूमिका वठवणे ही त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी आहे, असे तो म्हणाला. काही ठिकाणी मालिकेतील पेहरावाच्या व संवादाच्या बाबतीत त्रुटी असल्या तरी ‘डेली सोप’ असल्यामुळे संपूर्ण टीमवर भाग पूर्ण करण्याचा दबाव असतो. या मालिकेचे दिग्दर्शक प्रसाद गवंडी यांच्या मते, ऐतिहासिक विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ‘अशोका’ मालिकेचा महत्वाचा वाटा आहे. ऐतिहासिक संदर्भ जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो मात्र, तरीही काही ठिकाणी चुका होतातच. प्रेक्षकांनी त्यासाठी आपल्याला क्षमा करावी, असे दिग्दर्शक म्हणून वाटत असल्याचे प्रसाद गवंडी यांनी सांगितले. तर ‘जान्हवीचे बाबा’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनेता मनोज कोलटकर यांच्या मते प्रस्थापित ऐतिहासिक भाषेचा वापर कमीत कमी करून ही मालिका लोकांना जवळची वाटावी यासाठी विशेष प्रयत्न या मालिकेचे निर्माते-दिग्दर्शकांनी केला आहे.
‘अशोका’ मालिकेचे दोनशे भाग पूर्ण होणे हे यश संपूर्णत: टीमचे कर्तृत्त्व असून चाहत्यांच्या प्रेमामुळे यशस्वीरित्या आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो, असे मालिकेची निर्मिती संस्था ‘कॉन्टिलो पिक्चर्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू सिंह यांनी सांगितले.
आमचे स्वप्न अधूरेच!
मालिकेतील मोठे कलाकार आनंद साजरा करत असताना या मलिकेमध्ये दुय्यम भूमिका करणारे मात्र आपले स्वप्न कधी पूर्ण होणार याच्या प्रतिक्षेत आहेत. मालिकेसाठी हे कलाकार एक ते दीड वर्षांपासून एन.डी. स्टुडिओमध्ये वास्तव्य करीत आहेत. यात बिहार व गुजरातमधील तरूण मुलांची संख्या जास्त आहे. सिनेमा-मालिकांचे वेड घेऊन प्रसिद्ध होण्याच्या ध्येयाने ही मुले मुंबईत दाखल झाली आणि गेली अनेक वर्षे ते दुय्यम भूमिका करत आहेत. येथे काम करण्याऱ्या मुलांना दिवसागणिक २५० रूपये रोजगार मिळतो.