रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. त्यामध्ये तो भगवान श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारत आहे.

दरम्यान, अभिनेता चेतन हंसराजने चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, तो ‘रामायण’मध्ये रावणाचा आजोबा सुमालीची भूमिका साकारत आहे. चेतन हंसराजने असेही सांगितले की, चित्रपटाची कथा त्याच्या भूमिकेपासून सुरू होते.

‘मिनिट्स ऑफ मसाला’शी बोलताना चेतन हंसराज म्हणाला की, मी नुकतेच ‘रामायणम’चे शूटिंग पूर्ण केले आहे, ज्यामध्ये रणबीर आणि यश आहेत. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. शूटिंगचा अनुभव, हॉलीवूड टीम, प्रत्येक जण एक उत्तम व्यक्ती होते. हा अनुभव अविश्वसनीय होता. चेतनने चित्रपटासाठी सुमालीची त्याची व्यक्तिरेखा खूप महत्त्वाची असल्याचे वर्णन केले.

चेतन हंसराजने सांगितले की, सेटवर उपस्थित असलेले अनुभवी हॉलीवूड टेक्निशियनही चित्रपटाचा स्केल पाहून आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की, मी चित्रपटात रावणाच्या आजोबाची भूमिका साकारत आहे. ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. कथा त्याच्यापासून सुरू होते. मी जास्त काही सांगू शकत नाही; पण हे आतापर्यंतचे सर्वांत शानदार शूटिंग आहे. मी यापूर्वी कधीही असे काही पाहिले नव्हते. हॉलीवूडहून आलेले लोकही म्हणू लागले की बॉस, हे काहीतरी वेगळेच आहे.

‘रामायण’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी नितेश तिवारी यांनी घेतली आहे. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, लारा दत्ता कैकयीच्या भूमिकेत, शीबा चड्ढा मंथराच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत व अरुण गोविल दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होण्याची योजना आहे. तर, दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत दाखल होईल. वृत्तानुसार, दुसऱ्या भागाचे चित्रीकरण या वर्षी ऑक्टोबरपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. हा बॉलीवूडमधील आतापर्यंतचा सर्वांत मोठा सिनेमा असल्याचे बोलले जात आहे.