'फत्तेशिकस्त’ या चित्रपटात शिवरायांच्या गनिमी काव्याचा रुपेरी विस्तार अधिक व्यापक आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशा पद्धतीने मांडणी केली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळवून बॉक्स ऑफिसवर देखील कामगिरी फत्ते केली. ‘फर्जंद’ या चित्रपटानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी फत्तेशिकस्त या चित्रपटात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. लवकरच हा चित्रपट झी टॉकीज वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या निमित्ताने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे अविस्मरणीय किस्से सांगताना अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणाले, "फत्तेशिकस्त चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान खूप महत्वाच्या गोष्टी घडल्या. त्यातली अविस्मरणीय गोष्ट म्हणजे आम्ही राजगडावर केलेलं शूटिंग. राजगडावर एक नेढे आहे, त्या नेढ्यात बसून आम्ही एक सीन केला होता. खूप उंचावर डोंगराच्या मधोमध आपोआप झालेलं एक भगदाड आहे ते. मला उंच ठिकाणांची भीती आहे. पण आम्ही तिथे जेव्हा शूटिंग केलं तेव्हा माझी संपूर्ण भीती निघून गेली. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता." आणखी वाचा : 'जाहीर माफी मागतो' म्हणत 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढावेने लिहिली मन हेलावणारी पोस्ट चित्रपटातील भाषणाच्या दृष्याबाबत ते पुढे म्हणाले, "मोहिमेवर निघण्याआधी माझं एक भाषण आहे. ते दिग्पालने ऐनवेळी बदललं. आधीचं भाषण त्याला फारस आवडलं नव्हतं. त्याने नंतर लिहिलेलं भाषण फारच सुंदर होतं. क्वचितच एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला इतकं सुंदर भाषण सिनेमामध्ये करण्याची संधी येते. त्याने ज्या कागदावर मला ते भाषण लिहून दिल होतं त्यावर मी त्याची सही घेतली होती. अजूनही तो कागद मी जपून ठेवलेला आहे."