अभिनेत्री चिन्मयी सुमीत म्हणजेच अभिनेता सुमीत राघवन यांच्या पत्नी. परंतु केवळ एवढीच त्यांची ओळख नाही आहे. आजवर अनेक हिंदी-मराठी मालिका, चित्रपट आणि मराठी नाटय़सृष्टीत त्यांनी आपल्या हरहुन्नरी पण नेटक्या अभिनयाची छाप दाखवली आहे. चिन्मयी आता आपल्याला झी युवावरील लोकप्रिय मालिका “बन मस्का ” मध्ये दिसणार आहे. मैत्रेयीची आई म्हणून चिन्मयी बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करीत आहे.
बन मस्का या मालिकेत शिवानी रांगोळे आणि शिवराज वैचल हे मैत्रेयी आणि सौमित्र यांची भूमिका साकारत आहेत. या प्रेमी युगुलांची, एक अतिशय ट्विस्टेड (Twisted) लव्हस्टोरी सुरेख प्रकारे दिग्दर्शक विनोद लवेकर यांनी या मालिकेत दाखवली आहे. मैत्रेयी एक व्हॉइस ओव्हर डबिंग आर्टिस्ट आहे आणि तिचे तिच्या आई बरोबर जराही पटत नाही. त्यामुळे ती पुण्यामध्ये तिची माई आजी म्हणजेच ज्योती सुभाष यांच्या बरोबर राहत असते. मालिकेत मैत्रेयी आणि सौमित्र यांच्या लग्नाच्या बोलणी सुरु झाल्यामुळे आता पहिल्यांदाच मैत्रयीच्या आईचा ट्रॅक या मालिकेमध्ये येत आहे.
चिन्मयीचे कॅरेक्टर हे अतिशय व्यवहारिक असून, ती मुंबई मध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर आहे. तिचे स्वतःचे हॉस्पिटल असून तिला मैत्रयीचे बालिश वागणे जराही पटत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असतात. चिन्मयीच्या द्रुष्टीने मुलांमध्ये शिस्त असणे महत्वाचे असते. आणि मैत्रयीला मात्र स्वतःच्याच विश्वामध्ये रमायला आवडते. चिन्मयी आणि मैत्रयीचे, आई – मुलीचे नाते फुलेल का? ती सौमित्रचा, मैत्रेयीसाठी स्वीकार करेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी तुम्हाला झी युवा वाहिनीवर लागणारी बन मस्का ही मालिका पाहावी.