सेलिब्रिटींबरोबर फोटो काढता यावं, त्यांना भेटता यावं यासाठी बरेच चाहते एअरपोर्टवर, त्यांच्या शूटिंग सेटवर किंवा त्यांच्या घरी पोहोचतात. मेगास्टार चिरंजीवी यांच्या एका चाहतीनं असं काही केलं आहे की, सर्व जण तिचे कौतुक करीत आहेत.

या चाहतीनं अभिनेत्याला पाहण्यासाठी आंध्र प्रदेशातील अदोनी ते तेलंगणातील हैदराबाद, असा ३०० किमी सायकलवरून प्रवास केला आहे. राजेश्वरी नावाची ही चाहती अदोनीची रहिवासी आहे. वाटेत तिला अनेक अडचणी आल्या; पण तिनं तिचा प्रवास सुरूच ठेवला. अखेर ती चिरंजीवी यांना भेटण्यात यशस्वी झाली.

जेव्हा चिरंजीवी यांना कळलं की, त्यांची चाहती त्यांना भेटण्यासाठी ३०० किमी प्रवास करून आली आहे, तेव्हा ते तिला अजिबात विलंब न करता भेटले. ही भेट खूपच भावनिक होती. मीडिया रिपोर्टसनुसार, चिरंजीवी राजेश्वरीच्या प्रामाणिकपणानं प्रभावित झाले आणि त्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं. मेगास्टारनं तिला साडी भेट दिली.

राजेश्वरीनं चिरंजीवी यांना बांधली राखी

राजेश्वरी भावूक झाली आणि तिनं अभिनेत्याला राखी बांधली. चिरंजीवी यांनी राजेश्वरीला आश्वासन दिलं की ते तिच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतील. त्याशिवाय चिरंजीवी यांनी तिच्या कुटुंबाला शक्य तितकी मदत करू, असं आश्वासन दिलं. त्यांच्या या कृतीनं चाहत्यांची मनं जिंकली.

तेलुगू चित्रपटसृष्टीत अतुलनीय योगदान देणाऱ्या चिरंजीवी यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी अनेक तेलुगू चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. या अभिनेत्यानं १९९० मध्ये ‘प्रतिबंध’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. १९९२ मध्ये ते ‘आज का गुंडाराज’मध्येही दिसले. हा चित्रपट नागार्जुनच्या ‘गुंडा राज’चा हिंदी रिमेक होता. त्याबरोबरच ते ‘द जंटलमन’मध्येही दिसले. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

चिरंजीवी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात खलनायकी भूमिका साकारून केली. काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये ‘आय लव्ह यू’, ‘इदी कथा काडू’, ‘मोसागाडू’, ‘राणी कसुला रंगम्मा’ व ‘रानुवा’ ‘वीरन’ यांचा समावेश आहे.

चिरंजीवी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहेत. त्यांचे दोन बहुप्रतीक्षित चित्रपट म्हणजे ‘मन शंकर वर प्रसाद गरू’ व ‘विश्वंभरा’. ‘मन शंकर वर प्रसाद गरू’ आधीच चर्चेत आहे. हा चित्रपट चिरंजीवी आणि नयनताराचा ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ व ‘गॉडफादर’ या त्यांच्या मागील हिट चित्रपटांनंतरचा तिसरा चित्रपट आहे. दुसरीकडे ‘विश्वंभरा’ २०२६ च्या उन्हाळ्यात प्रदर्शित होणार आहे.