बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या खासगी आयुष्यात कोणत्या स्तरावर आणि कधी उलथापालथ होईल, याचा काही नेम नाही. शेअर बाजारातील निर्देशांकापेक्षाही येथील नातेसंबंधांमध्ये जास्त चढउतार असतात. शाहरूख आणि प्रियांका चोप्रा यांच्याबद्दलच्या चर्चाना ऊत आल्यानंतर संजय दत्त आणि आमिर खान यांच्यातील वादाला तोंड फुटले. तर दुसरीकडे चित्रांगदा सिंगच्या खासगी आयुष्यात घटस्फोटाचे वादळ आल्याची आवईही उठली. खुद्द चित्रांगदाने मात्र या घटस्फोटाच्या बातमीत काहीच तथ्य नसल्याचे सांगितले आहे.
चित्रांगदा आणि तिचा नवरा गोल्फपटू ज्योती रंधवा या दोघांना काही दिवसांपूर्वी गुरगांवच्या न्यायालयात लोकांनी बघितले. मुंबईतील चित्रपट आणि दिल्लीत असलेला पाच वर्षांचा मुलगा झोरावर या दोन्हीकडे लक्ष देणे चित्रांगदाला जड जात आहे. त्यामुळे या दांपत्यात सातत्याने भांडणे होत असून आता या दोघांनी वेगळे होण्याचा विचार केला आहे, अशी बातमीही पसरली होती. मात्र चित्रांगदाने ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.
आम्ही गुरगांव न्यायालयात जमिनीसंबंधातील एका वादासाठी गेलो होतो. लोकांनी आपल्याला काहीच न विचारता आपल्या संसाराबाबत बातम्या दिल्या. या बातम्यांमुळे आमचे कुटुंब हादरले आहे. मूळात आमच्यात आपसात काहीच कुरबुरी नाहीत, असे चित्रांगदाने स्पष्ट केले.
चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधीच २००१मध्ये लग्न केले होते. त्यानंतर २००३मध्ये आलेल्या ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’ या चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केले. मुलाच्या जन्मानंतर २००५ ते २००८ ही तीन वर्षे ती चित्रपटसृष्टीपासून लांब होती. चित्रांगदाचा संसार फार नीट चाललेला नाही, अशा प्रकारच्या बातम्या याआधीही पसरल्या होत्या. मात्र दर वेळी तिने या बातम्या खोडून काढल्या होत्या.