कलाविश्वातील वर्णभेद हा मुद्दा काही नवीन नाही. अनेक कलाकारांना उत्तम अभिनय येत असताना सुद्धा केवळ वर्णभेदामुळे त्यांना डावलण्यात आलं आहे. याविषयी अनेक कलाकार व्यक्तदेखील झाले आहेत. यामध्येच आता प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाने त्याच्या अनुभवांचं कथन केलं आहे. केवळ कलाविश्वाच नाही, तर अगदी लहानपणापासून त्याला वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला आहे, असं त्याने अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

“मी अगदी लहान असल्यापासून मला वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला आहे. लोक माझ्या रंगावरुन कायम मला चिडवायचे, माझ्या रंगावर भाष्य करायचे. मात्र, मी कधीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत होतो. पण, आजही आपल्या देशात वर्णद्वेष केला जातो हे सत्य आहे”, असं रेमो म्हणाला.

रेमो डिसूझाप्रमाणेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा, मलायका अरोरा, सोनम कपूर, हर्षदा खानविलकर यांसारख्या अनेक कलाकारांना वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे या वर्णभेदावर आधारित अनेक मालिका, चित्रपटांचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रेमो डिसूझा कलाविश्वातील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आणि दिग्दर्शक आहे. २०१३ मध्ये त्याचा ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर त्याचा एबीसीडी 2 हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभूदेवा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.