“चित्रपटाचा आस्वाद घ्यायचा असेल तर मोबाईल आणि समीक्षक दोन्ही सायलेंट मोडवर ठेवा,” या एका संवादातच संपूर्ण चित्रपटाचा सार आहे. आज सोशल मीडियाच्या युगात स्मार्टफोन हातात घेऊन मनात येईल ते लिहिणाऱ्या काही हौशी आणि तसेच प्रोफेशनल समीक्षकांच्या गालावर हा चित्रपट म्हणजे एक जोरदार चपराक आहे. ‘पा’, ‘चीनी कम’, ‘पॅडमॅन’सारख्या चित्रपटातून सतत काहीतरी वेगळा विषय हाताळणारे दिग्दर्शक आर.बल्की यांनी यावेळी ‘चूप : रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’च्या माध्यमातून सस्पेन्स थ्रिलर हा प्रकार हाताळला आहे. बऱ्याच दिवसांनी खुर्चीला खिळवून ठेवणारा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यात ते यशस्वी झाले आहेत. याबरोबरच गेल्या काही महिन्यांत चित्रपटगृहापासून दूर गेलेल्या प्रेक्षकाला पुन्हा खेचून आणण्याची ताकदही या चित्रपटात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईची चित्रपटसृष्टी आणि प्रत्येक चित्रपटावर अगदी बेधडकपणे भाष्य करणाऱ्या समीक्षकांच्या आयुष्यात अचानक एंट्री होते एका सायको किलरची. चित्रपट समीक्षकांना यमसदनी धाडण्याचा निर्धार करून मुंबईच्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या या सायको किलरचं नेमकं उद्दिष्ट काय? त्याचा भूतकाळ काय? मुंबई पोलिसांना त्याला पकडण्यात यश मिळेल का? या एकूण कथानकाभोवती हा चित्रपट फिरतो. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जे दाखवण्यात आलं आहे बहुतेक तेच सगळं चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतं. एक वेगळी संकल्पना म्हणून हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही. खासकरून अशाप्रकारच्या चित्रपटासाठी जी वेगवान पटकथा अपेक्षित असते तीच आपल्याला यामध्ये बघायला मिळते आणि यामुळेच प्रेक्षक कथेशी शेवटपर्यंत बांधलेला राहतो. कथा आणि पटकथेबरोबरच चित्रपटाचे संवाद ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. काही ठिकाणी हसवण्यात तर काही ठिकाणी समीक्षकांच्या आणि चित्रपटक्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या मानसिकतेवर मार्मिक टिप्पणी करण्यात लेखकाला यश मिळालं आहे.

कोणताही इतर मसाला किंवा फाफटपसारा न मांडता हा चित्रपट त्याच्या मुख्य प्लॉटला धरूनच पुढे जातो त्यामुळे तो कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. चित्रपटाचं संगीतही दमदार असून चित्रपटातलं नाट्य अधिक गडद करण्यात त्याचा फायदा होतो. याबरोबरीनेच चित्रपटातील सगळ्याच कलाकारांची कामं अगदी चोख झाली आहेत. श्रेया धन्वंतरीने साकारलेलं नीला मेनन हे पात्र फारसं स्क्रीनवर दिसत नसलं तरी त्या पात्राचं महत्त्व अधोरेखित होतं. श्रेयानेही यामध्ये चांगलीच साथ दिली आहे. सनी देओल हा बऱ्याच काळानंतर पडद्यावर दिसत असला तरी पोलिस ऑफिसर अरविंदच्या भूमिकेत पडद्यावरील त्याचा वावर अजूनही तितकाच सहज आहे. पूजा भट्ट हीचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे जी तिने उत्तमरीत्या साकारली आहे. अभिनेता दुलकर सलमान याने साकारलेली भूमिका लोकांचं लक्ष वेधून घेणारी ठरेल, खरंतर सायको किलर ही भूमिका वाट्याला येणं आणि त्याचं चीज करणं हे प्रत्येक अभिनेत्याला जमेलच असं नाही. पण दुलकरने त्याच्या लाजवाब अदाकारीमधून स्वतःला पुन्हा एकदा एक उत्कृष्ट अभिनेता असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे. चित्रपटाला दिलेला गुरुदत्त टच हा खरंच खूप खास आहे आणि कुठेही तो ओढून ताणून आणलेला वाटत नाही. गुरुदत्त यांच्या चित्रपटातील गाणी, दृश्यं अगदी अचूक यामध्ये पेरल्याने ते संदर्भ चुकीचे किंवा असंबद्ध वाटत नाहीत.

विशाल सिन्हा याच्या कॅमेरामधून मुंबईचं एक वेगळंच चित्र आपल्यापुढे उभं राहतं आणि त्याचा प्रभाव बराच काळ तुमच्या मनावर राहील हे नक्की. चित्रपटातील प्रेम कहाणी आणि क्लायमॅक्स या दोन गोष्टीत थोडा चित्रपट कमी पडल्याचं जाणवतं. दुलकर आणि श्रेया यांच्यातलं नातं आणि त्यामागचे भावनिक कंगोरे अधिक उत्तमरित्या उलगडता येऊ शकले असते. शिवाय चित्रपटाचा शेवट हा खूप वेगळा आहे आणि तो पाहताना आपलं डोकं सुन्न होतं हेदेखील खरंय. घरगुती हिंसाचारासारखा गंभीर मुद्दा शेवटच्या काही मिनिटांत फार प्रभावीपणे बल्की यांनी मांडायचा प्रयत्न केला आहे. फक्त हा शेवट अगदी पटापट गुंडाळल्यासारखा वाटल्याने थोडी निराशा होते. पण पूर्ण चित्रपटाच्या अनुभवासमोर ही तशी क्षुल्लक गोष्ट आहे.

आणखी वाचा : आत्तापर्यंत ऑस्करला पाठवलेल्या भारतीय चित्रपटांची निवड खरंच योग्य ठरली आहे का?

चित्रपटसृष्टीमधील कारभारावर भाष्य करण्याबरोबरच समीक्षकांची चांगलीच कानउघडणी हा चित्रपट करतो. खोटी टीका किंवा खोटं कौतुक यामुळे चित्रपटाचं आणि रासिकांचंच नुकसान होतंय हेदेखील हा चित्रपट अधोरेखित करतो. एक नवीन संकल्पना म्हणून आर बल्की यांचा हा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. चित्रपटात बराच रक्तपात आणि हिंसाचार असल्याने प्रत्येकाला तो झेपेलच असं नाही. जर तुम्ही एक चित्रपटरसिक असाल आणि अशा प्रकारचं कथानक तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आवर्जून हा चित्रपट एकदा बघायलाच हवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chup revenge of the artist movie review read here dulquer salmaan sunny deol shreya dhanvantarys film review in marathi avn
First published on: 23-09-2022 at 15:25 IST