Coolie Box Office Collection Day 1 : रजनीकांत ‘कुली’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. १४ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि आता हा चित्रपट येताच हिट झाला आहे.
‘कुली’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या तामिळ चित्रपटाने स्पाय युनिव्हर्सच्या ‘वॉर २’ ला मागे टाकले आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘कुली’ चित्रपटाने भारतात ६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशाप्रकारे, रजनीकांत यांच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईच्या बाबतीत ‘वॉर २’ला मागे टाकले आहे आणि २०२५ सालच्या सर्व चित्रपटांनाही मागे टाकले आहे.
रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाने विकी कौशलच्या ‘छावा’ (३१ कोटी), सलमान खानच्या ‘सिकंदर’ (२६ कोटी), अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’ (२४ कोटी), अहान पांडे-अनित पड्डा यांच्या ‘सैयारा’ (२१.५ कोटी) आणि अजय देवगणच्या ‘रेड २’ (१९.५ कोटी) या चित्रपटांचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन रेकॉर्ड मोडले आहेत. हे सर्व चित्रपट २०२५ सालचे टॉप ५ ओपनर ठरले आहेत.
‘कुली’ चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
‘कुली’ हा चित्रपट लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘लियो’, ‘कैथी’ आणि ‘विक्रम’सारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत. रजनीकांत व्यतिरिक्त नागार्जुन, उपेंद्र, श्रुती हासन आणि सौबिन शाहीर सारखे कलाकारदेखील ‘कुली’मध्ये आहेत. या चित्रपटात आमिर खानने एक छोटीशी भूमिका केली आहे.
‘वॉर २’ने पहिल्या दिवशी किती कोटी कमावले?
सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा सहावा भाग हा ‘वॉर’ (२०१९) चा सिक्वेल आहे. हृतिक आणि ज्युनियर एनटीआर स्टारर ‘वॉर २’ने सर्व भाषांमध्ये ५२.५० कोटी रुपयांची कमाई केली. ‘वॉर २’च्या पहिल्या दिवशीच्या एकूण कलेक्शनमध्ये हिंदीतून २९ कोटी रुपये, तेलुगूतून २३.२५ कोटी रुपये आणि तामिळ आवृत्तीतून २५ लाख रुपये यांचा समावेश आहे. हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त, कियारा अडवाणी आणि आशुतोष राणा हे वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या ‘वॉर २’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे.