दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला ‘कुली’ हा बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. येत्या १४ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये रजनीकांत यांच्यासह नागार्जुन, उपेंद्र, सौबिन शाहीर, सत्यराज व श्रृती हासन यांसारखे प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. त्यासह ‘कुली’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेता आमिर खानही झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
लोकेश कनागराज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रजनीकांत व लोकेश हे दोघे पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र काम करीत आहेत. यापूर्वी लोकेश यांनी ‘कैथी’, ‘मास्टर’, ‘विक्रम’ व ‘लिओ’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. हा एक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. ‘पिंकव्हिला’च्या माहितीनुसार या चित्रपटाचं बजेट ३५० कोटी इतकं असून, रजनीकांत यांनी या चित्रपटासाठी १५० कोटी रुपयांची मागणी केली आहे; तर ५० कोटी हे दिग्दर्शकाचं मानधन असणार आहे. उर्वरित १५० कोटी इतकी रक्कम इतर कलाकारांचं मानधन, तांत्रिक खर्च या सर्वांसाठी वापरली जाणार आहे.
चित्रपटाचं बजेट बरंच मोठं असून ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार ‘कुली’ चित्रपटाचे काही हक्क आधीच विकले गेले आहेत आणि ओटीटीचे हक्क १३० कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. ‘सन पिक्चर्स’च्या बॅनरखाली कलानिधी मारन निर्मित ‘कुली’ या चित्रपटाने सॅटेलाइट डीलमधून ९० कोटी रुपये आणि संगीत हक्कांमधून २० कोटी रुपये कमावले आहेत.
रजनीकांत नुकतेच ‘वेट्टयान’, ‘लाल सलाम’ या चित्रपटांमधून झळकले होते. आता ते लवकरच ‘कुली’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामध्ये ते देवा ही भूमिका साकारणार आहेत. ‘कुली’ हा एक अॅक्शनने भरलेला चित्रपट आहे. त्यात असलेल्या स्टारकास्टला प्रेक्षक मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
रजनीकांत यांनी आजवर जवळपास १७० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतेच ते ‘वेट्टैयन’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. त्यांच्या या चित्रपटानं चांगली कमाई केली होती. आता ते ‘कुली’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सकता असल्यानं त्यामध्ये नक्की काय पाहायला मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.