जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुमुळे जनजीवन ठप्प व्हायची वेळ आली आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या करोनामुळे गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन रद्द करण्यात येत आहे. केंद्र सरकारने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं असं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातही उपाययोजना केल्या जात असून, अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यात आता २७ मार्चपासून सुरू होणाऱ्या १००व्या नाट्य संमेलनावर तात्पुरता पडदा टाकण्यात आला आहे. नाट्य संमेलन पुढे ढकलत असल्याची घोषणा नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आली.

चीनमधील वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या करोना विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. मुंबई, पुणे अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये करोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात भितीचं वातावरण पसरलं आहे. सरकारकडून वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील करोनाविषयीची भीती नागरिकांमध्ये पसरल्याचं दिसून येत आहे. याचाच परिणाम सांगलीत होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनावर झाला आहे. यंदा सांगलीत होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नाट्य परिषदेकडून देण्यात आली आहे. यंदाचं नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून या कालावधीमध्ये संपन्न होणार होतं.

काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी आयोजकांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये हे संमेलन यशस्वीरित्या करण्याची चर्चा करण्यात आली. त्यामुळे राजकीय स्तरावर या संमेलनाविषयी उत्साहाचं वातावरण होतं. मात्र प्रशासकीय पातळीवर हे संमेलन पुढे ढकलण्याचा पर्याय सुचविण्यात आला होता. सध्या देशावर करोनाचं संकंट असल्यामुळे हा धोका लक्षात घेत होणारं संमेलन पुढे ढकलण्याचा पर्याय सांगलीचे निवास उपजिल्हाधिकारी यांनी दिला आहे. त्यानंतर आता नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे. मात्र आता हे नाट्य संमेलन नेमकं कोणत्या तारखेला होणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही.