करोना व्हायरचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले. या २१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये घरात बसून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशातच सोशल मीडियावर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा दाखवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर प्रसार भारतीचे मुख्य अधिकारी शशी शेखर प्रेक्षकांच्या या मागणीचा विचार करत असल्याचे समोर आले होते. आता रामायण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत शनिवारपासून रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येणार असल्याची माहिती दिली. ‘मला सांगताना आनंद होत आहे की, लोकांच्या मागणीनुसार, आम्ही रामायण ही लोकप्रिय मालिका शनिवार, २८ मार्च रोजी डीडी नॅशनल या चॅलेनलवर टेलिकास्ट करणार आहोत. दररोज सकाळी ९ ते १० आणि पुन्हा रात्री ९ ते १० या वेळेत रोज एक एपिसोड दाखवण्यात येणार आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बुधवारी प्रसार भारतीचे मुख्य अधिकारी शशी शेखर प्रेक्षकांच्या या मागणीवर विचार करत असल्याचे दिसले. त्यांनी ट्विट करत ‘आम्ही मालिका पुन्हा दाखवण्यासाठी मालिकेच्या स्वामित्व हक्क धारकांशी या विषयी चर्चा करत आहोत. तुम्हाला याबाबत लवकरच कळवू’ असे म्हटले होते. आता त्यांनी ही मागणी पूर्ण केल्यामुळे प्रेक्षक फार आनंदी आहेत.

आणखी वाचा : ३२ वर्षानंतर कपिल शर्मा शोमध्ये उलगडलं ‘रामायणा’चं रहस्य

‘रामायण’ ही मालिका त्यावेळी छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका होती. ती पाहण्यासाठी लोक एकत्र जमायचे. आता ही मालिका पाहायला मिळणार म्हणजे  ‘मंगल भवन अमंगल हारी… ‘ या ओळी पुन्हा कानावर पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील काही कलाकार द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले होते.