भारतीय धाडसी कस्टम अधिकारी कोस्टाओ फर्नांडिस यांच्या जीवनकथेवर प्रेरित ‘कोस्टाओ’ हा हिंदी चित्रपट ‘झी फाइव्ह’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी कोस्टाओ फर्नांडिस यांची भूमिका साकारली असून मारिया फर्नांडिस ही त्यांच्या पत्नीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट यांनी केली आहे. यानिमित्ताने नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव, मारियाचे वेगळेपण, मराठी चित्रपटसृष्टी तसेच वेबमालिकांच्या सद्या:स्थितीबाबत प्रिया बापट हिच्याशी साधलेला हा मुक्तसंवाद…

‘कोस्टाओ’चे विविध पैलू उलगडण्यावर भर

सध्याच्या बॉलीवूड, दाक्षिणात्य, मराठी आणि विविध प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण चित्रपटांच्या मांदियाळीत ‘कोस्टाओ’ चित्रपटाचे वेगळेपण अधोरेखित करताना प्रिया बापट म्हणते, ‘मी आतापर्यंत एका कस्टम अधिकाऱ्याची गोष्ट रुपेरी पडद्यावर पाहिलेली नाही. कोस्टाओ फर्नांडिस या कस्टम अधिकाऱ्याचे व्यावसायिकदृष्ट्या कार्य किंवा त्यांनी कसा त्याग केला, सत्याची बाजू घेऊन पुढे काय झाले? यापलीकडे जाऊन त्यांचे पात्र माणूस म्हणून समोर आले, तरच आपण या पात्राशी जोडले जाऊ शकतो. त्यामुळे कोस्टाओचे माणूस म्हणून विविध पैलू दाखविण्यावर भर देण्यात आला आहे. ही केवळ गुन्हेविश्वातील शोधकार्याची कथा नाही, तर एका माणसाच्या आयुष्याचा मांडलेला पट आहे. त्यामुळे मला ‘कोस्टाओ’चे कथानक आवडले आणि या चित्रपटात भूमिका करण्याचा निर्णय घेतला’.

नवऱ्यासोबत उभी राहणारी मारिया

मी कोस्टाओच्या पत्नीची भूमिका केली आहे. प्रत्येक लग्न ठरताना दोन्ही बाजूंनी काही अपेक्षा असतात आणि लग्न झाल्यानंतर दहा ते बारा वर्षांत काळानुसार, वयानुसार व अनुभवानुसार या अपेक्षा बदलत जातात. त्यामुळे दोघांना नेमके काय हवे आहे? हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. एकमेकांच्या अपेक्षा टोकाच्या असतील, तर त्या अपेक्षा पूर्ण करणे कष्टाचे ठरते. त्यामुळे कोस्टाओवर नितांत प्रेम करणारी, त्याच्याबरोबर ठामपणे उभी राहणारी आणि आयुष्यात स्वत:साठी निर्णय घेणारी मारिया चित्रपटात दिसते. मारियाचा एक सुंदर भावनिक आलेख यात पाहायला मिळतो, असे प्रियाने सांगितले.

कलाकाराला कोणतीही भूमिका साकारण्यासाठी विशेष तयारी करावी लागते. कथानकाच्या अनुषंगाने अभ्यासही करावा लागतो. अनेकदा हा प्रवास आव्हानात्मक असतो. ‘मारिया’ ही भूमिका साकारतानाच्या प्रवासाबद्दल प्रिया म्हणते, ‘सरळसाधी, सोपी भूमिका करणेही प्रचंड आव्हानात्मक असते. त्यामुळे एखाद्या भूमिकेकडे तुम्ही कसे बघत आहात, हे माझ्यासाठी महत्त्वाचे असते.

एखादा कलाकार जेव्हा विविध अडथळे पार करून यशस्वी टप्प्यावर येऊन पोहोचतो, तेव्हा कलाकाराला त्याच्या आजवरच्या प्रवासाची जाणीव असते, किंमत असते. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनाही आपल्या संघर्षमय प्रवासाची जाणीव असून सहकलाकारांना समजून घेऊन ते काम करतात. आजही त्यांचे पाय जमिनीवर असून ते सहकलाकारांना खूप सहकार्य करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्थिक जोखीम स्वीकारण्याचेधाडस कोण करणार?

आपण मराठी कलाकृती किती पाहतो आणि आपण नेमक्या कोणत्या मराठी कलाकृतींची निर्मिती करतो, हे सर्व एकमेकांमध्ये गुंतलेले आहे. मराठी नाटकांना प्रेक्षकांचा खूप सुंदर प्रतिसाद मिळतो, मात्र हाच प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे का वळत नाही? नाटक आणि चित्रपटात काम करणारे कलाकारही आम्हीच आहोत, परंतु तरीही मराठी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी का होत नाही? हा प्रश्न मला नेहमीच पडतो. मराठीत वैविध्यपूर्ण वेबमालिका आल्या, परंतु या वेबमालिका किती जणांनी पाहिल्या? वेगळ्या वेबमालिका करूनही प्रेक्षक प्रतिसाद देत नसतील, तर मराठीसाठी स्वतंत्र ओटीटी माध्यम तयार करून आर्थिक जोखीम घेणे कोण स्वीकारणार, मराठी चित्रपटांना चित्रपटगृहातच कमी प्रतिसाद मिळत असेल, तर मग आपले मराठी चित्रपट ओटीटी माध्यमावर कसे येणार?, असे प्रश्न प्रियाने उपस्थित केले. कलाकृतींची संख्या वाढली की अर्थकारणही बदलते, तसेच ही आर्थिक गणिते जुळणेही महत्त्वाचे असते आणि ही सर्व आर्थिक गणिते जुळत असतील, तरच मराठीसाठी स्वतंत्र ओटीटी माध्यम असो किंवा वेगवेगळ्या वेबमालिकांची निर्मिती करण्याचे धाडस कोणीतरी करेल, असे स्पष्ट मत प्रिया बापट हिने व्यक्त केले.