Actor Raghav Tiwari Attacked in Versova: मुंबईच्या वर्सोवा भागात ‘क्राईम पेट्रोल’फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात हिंदुस्तान टाईम्सनं सविस्तर वृत्त दिलं असून त्यात अभिनेत्यानं घडलेला घटनाक्रम सविस्तर सांगितला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा हल्ला केल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा त्या हल्लेखोरानं आपल्याला रस्त्यावर हटकलं आणि दमदाटी केल्याचं या अभिनेत्यानं सांगितलं आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस संबंधितांचा शोध घेत आहेत.

‘क्राइम पेट्रोल’ मालिकेतून लोकप्रिय झालेले अभिनेते राघव तिवारी यांच्याबाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. राघव तिवारींनी त्यांच्यावर गुदरलेल्या या प्रसंगाचा सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे. हा सगळा प्रकार ३० डिसेंबरला संध्याकाळी घडल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, वर्सोवा भागातील डीमार्टमध्ये ते त्यांच्या काही मित्रांसमवेत गेले होते. तिथून बाहेर पडल्यावर रस्ता ओलांडताना चुकून ते एका दुचाकीसमोर आले. आपली चूक लक्षात येताच तिवारी यांनी दुचाकीस्वाराची माफीदेखील मागितली. पण त्यावर दुचाकीस्वारानं थेट खिशातून चाकू काढून राघव तिवारींवर हल्ला करायला सुरुवात केली.

“मी त्याची माफी मागितली, तरी…”

“मी त्याची माफी मागितली. मी त्याला म्हटलं की यावर आपण भांडायला नको. पण मी जसा भांडणाचा उल्लेख केला, त्यानं खिशातून चाकू काढला आणि माझ्यावर वार करायला सुरुवात केली. तो व्यावसायिक हल्लेखोर किंवा गुंड वाटत होता. त्यानं वार करायला सुरुवात करताच मी मागे सरकलो. माझ्या एका मित्रानं मध्ये पडायचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही तो हल्लेखोर पुढे झाला आणि त्यानं माझ्या कानशि‍लात लगावली. मी सध्या एका प्रोजेक्टवर काम करतोय. त्यामुळे मला या भांडणात पडायचं नव्हतं”, असं तिवारींनी सांगितलं.

हे भांडण वाढू लागल्याचं पाहून तिवारींनी एक लाकडी काठी शोधली आणि हल्लेखोरावर वार केला. त्या झटापटीत त्याच्या हातातून चाकू खाली पडला. पण नंतर त्यानं दुचाकीच्या डिकीतून बीअरची बाटली आणि लोखंडी रॉड काढला. झटापटीत तिवारींकडची काठी तुटली आणि त्याचवेळी हल्लेखोरानं लोखंडी रॉडनं तिवारींच्या डोक्यावर वार केला. या धक्क्याने तिवारी खाली कोसळले.

सहा टाके, रुग्णालयात उपचार

राघव तिवारींच्या मित्रांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. “माझ्या डोक्यावरच्या जखमेतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. मला डोक्याच्या मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूलाही प्रत्येकी ६ टाके पडले”, असं राघव तिवारींनी आयएएनएसला दिलेल्या माहितीत सांगितलं.

दरम्यान, पोलिसांना तक्रार दाखल करताना हल्लेखोरानं चाकू काढल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी याचा पुरावा मागितल्याचा आरोप राघव तिवारींनी केल्याचं हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. शिवाय, तिवारींनी तक्रार केल्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला नसल्याचाही दावा त्यांनी केला. नंतर मात्र पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फूटेज मिळवल्याचं तिवारींनी नमूद केलं.

सांगली : मिरजेत डॉक्टरवर हल्ला, रुग्णालयाची मोडतोड; घटनेचा निषेध, कारवाईची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांनी पुन्हा हल्लेखोरानं गाठलं

दरम्यान, या घटनेनंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा त्या हल्लेखोरानं तिवारींना गाठलं. “मी माझ्या एका मैत्रिणीसोबत काही औषधं घ्यायला गेलो होतो. परत येताना रस्त्यावरच त्या हल्लेखोरानं आम्हाला थांबवलं आणि ‘बोलायचंय’ असं सांगितलं. पण मी दोन्ही हात जोडून नकार दिला. पण त्यानंतरही हल्लेखोरानं त्यांना डिवचणं चालूच ठेवलं. त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही तिथून निघालो”, असं तिवारींनी सांगितलं.