भारतीय चित्रपटांचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके (३० एप्रिल १८७०, त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र – १६ फेब्रुवारी १९४४ नाशिक, महाराष्ट्र) यांचा आज (सोमवार) स्मृतिदिन. चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिले चित्रपटनिर्माते म्हणून त्यांची ओळख आहे. दादासाहेबांनी १९१३ साली राजा हरिश्चंद्र चित्रपटाची निर्मिती करून भारतातील चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १९३७ पर्यंतच्या १९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी तब्बल ९५ चित्रपट आणि २६ लघुपटांची निर्मिती केली. भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार हा त्यांच्या नावाने दिला जातो. दादासाहेबांचा जन्म नाशिकपासून तीन किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे झाला होता. १८८५ मध्ये त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. १८९० साली जे. जे. मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बडोद्यातील कला भवन येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला आत्मसात केली. गोध्रा येथे काही काळ छायाचित्रकाराचा व्यवसाय केलेल्या दादासाहेबांना गोध्रात पसरलेल्या ब्युबॉनिक प्लेगच्या उद्रेकात प्रथम पत्नी आणि नंतर मूल दगावल्याने गोध्रा सोडावे लागले. गोध्रा सोडल्यावर त्यांची ल्युमिएर बंधूंकडील चाळीस ‘जादूगारां’पैकी कार्ल हर्ट्झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे’साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. नोकरीत त्यांचे मन लागत नव्हते. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात वाकबगार असलेल्या दादांनी छपाई व्यवसाय सुरु केला. त्यांनी राजा रविवर्मां सोबतसुद्धा काम केले. पुढे स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली. छपाई व्यवसायात सहकाऱ्यांशी न पटल्याने त्यांनी छपाई व्यवसायास रामराम ठोकला. पुढे “लाईफ ऑफ ख्रिस्त” हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष चित्रपट निर्मितीकडे वळवले. १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला. ३ मे १९१३ साली मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात तो प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा दाखविण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2015 रोजी प्रकाशित
भारतातील पहिल्या मूकपटाच्या निर्मात्याचा प्रवास
भारतीय चित्रपटांचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके (३० एप्रिल १८७०, त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र - १६ फेब्रुवारी १९४४ नाशिक, महाराष्ट्र) यांचा आज (सोमवार) स्मृतिदिन.

First published on: 16-02-2015 at 12:53 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजनManoranjanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadasaheb phalke