पुराणकथा, आख्यायिका, लोककलांच्या आधारे वर्तमानाशी जोडून घेत काहीएक संदेश देण्याचा प्रयत्न चित्रपट माध्यमातून फार कमी वेळा केला गेला आहे. अनेकदा पुराणकथा किंवा ऐतिहासिक कथा मांडताना त्याचा भव्य-दिव्यपणा, तत्कालीन काळ देखणेपणाने उभा करत अनुपम दृश्यानुभूती देण्याकडे कल अधिक असतो. मात्र, दशावतारासारखी पारंपरिक लोककला आणि त्याचे मर्म समजून घेत त्या माध्यमातून कोकणातील सद्या:स्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी ‘दशावतार’ या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.

‘दशावतार’ ही लोककला आणि कोकणची भूमी, माणसं याचं घट्ट नातं आहे. दशावतार हे एखाद्या नाटकासारखे भव्य-दिव्यपणे मांडले जात नाही. त्यातली भव्यदिव्यता ही ती कला साकारणाऱ्यांच्या अभिनयात आहे. एखादा सामान्य माणूस चेहऱ्यावर रंग चढवून जेव्हा एखाद्या मंदिरातील छोट्याशा जागेत वा कुठल्याशा खुल्या सभागृहावजा जागेत दशावताराचा खेळ रंगवण्यासाठी उभा राहतो, तेव्हा त्यांच्या अभिनयातून, त्यांच्या अस्तित्वातून तो खेळ जिवंत होत जातो. देहभान हरपून दशावतारात कधी हनुमान, कधी धृतराष्ट्र, तर कधी सावित्रीच्या सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्यासाठी आलेल्या यमाची व्यक्तिरेखा साकारणारा कोणी एक बाबुली मेस्त्री हा असाच उत्तम दशावतार कलावंत. दशावतार हा त्याच्या जगण्याचा ध्यास आहे, श्वास आहे. मात्र, वाढत्या वयामुळे बाबुलीला दशावतार सोडावा लागणार आहे. दशावतारात काम करणार नाही, असे त्याच्याकडून वचन घेत एकप्रकारे आपण त्याच्याकडून जगणंच हिरावून घेतो आहोत, याची जाण बाबुलीच्या मुलाला माधवला आहे. पण बाबुलीचा दशावतार सोडायचा तर त्याला नोकरी करावी लागणार. कोकणात नोकरीच्या फार संधी नाहीत आणि त्याला बाबुलीला सोडून नोकरीसाठी मुंबईत जायचं नाही. अशा पेचात अडकलेल्या माधवला नोकरी मिळते तीही गावात सुरू झालेल्या खाणीत. आपला निसर्ग, आपली माती ओरबाडणाऱ्या खाणीत नोकरी करणं योग्य नाही, हे बाबुलीचं मत. अखेर मी कुठलंही चुकीचं काम हातून होऊ देणार नाही, असं बाबुलीला आश्वासन देत माधव काम सुरू करतो. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचं सोंग घेऊन दशावतार सादर करण्याचा निर्धार बाबुली करतो, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. बाप-लेकाच्या प्रेमापासून सुरू झालेला हा कथाध्याय कोकणात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करू पाहणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष उभा करणाऱ्या गावकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचतो.

‘दशावतार’ या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक – दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. नाणार रिफायनरी, जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प अशा मोठमोठ्या प्रकल्पांविरोधात कोकणवासीयांनी संघर्ष केला आहे. कोकणात विकास हवा आहे, पण विकासाच्या नावाखाली कोकणचा आत्मा असलेल्या जंगलांचा, निसर्गाचा आणि पर्यायाने तिथल्या भूमीपुत्रांचा विनाश नको आहे. मात्र, अनेकदा गावचा सरपंच, पोलीस पाटील, वन अधिकारी, स्थानिक राजकीय नेते या सगळ्यांना हाताशी धरून, गावकऱ्यांना अंधारात ठेवत अशा प्रकल्पांची वाट मोकळी करून दिली जाते. आपल्यासमोर अन्याय्य गोष्टी सुरू आहेत, याची जाणीव होऊनही त्याकडे कानाडोळा करत राहिलो तर विनाश अटळ आहे. त्यासाठी गावकऱ्यांनीच एकत्र येऊन अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न बाबुलीसारख्या मनस्वी कलाकाराच्या गोष्टीच्या माध्यमातून लेखक-दिग्दर्शकाने केला आहे. या कथाविषयाच्या अनुषंगाने चित्रपटाची मांडणी करताना कोकणातील जंगलं, कातळशिल्प, नदी-वहाळ, मंदिरं आणि तिथे रंगणारा दशावतार या सगळ्याचा दिग्दर्शकाने सुंदर वापर करून घेतला आहे. या चित्रपटात कुठेही कोकणातली कथा म्हणून कॅमेरा समुद्राच्या जवळही जात नाही. बराचसा कथाभाग हा गावात आणि प्रामुख्याने जंगलात घडतो. त्यामुळे कोकणातील घनदाट जंगलात अनुभवायला मिळणारी गूढता, शांतता, बारीकसारीक आवाजानिशी उमटणाऱ्या हालचाली हे जशाच्या तशा पोहोचवण्यासाठी दिग्दर्शकाने तांत्रिक मांडणीवर घेतलेली मेहनत दिसून येते. छायाचित्रणकार देवेंद्र गोलतकर यांनी जंगलातलं हे चित्रण कुठेही कृत्रिम वाटणार नाही इतक्या सुंदर पध्दतीने टिपलं आहे. चित्रपटाची निर्मितीमूल्यं, प्रकाशयोजना, ध्वनी या सगळ्याचा बारकाईने विचार केला असल्याने एक देखणा दृश्यानुभूती हा चित्रपट देतो. चित्रपटातली सगळीच पात्रं मालवणी बोलत नसली तरी बऱ्यापैकी त्यांच्या संवादातून मालवणी बोली ऐकू येते. काही स्थानिक कलाकार, विशेषत: दशावतारी नटही यात आहेत. या सगळ्यातूनही एक वेगळा परिणाम साधला गेला आहे.

ढोबळपणाने चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही लक्षात घेतले तरी कथेचा वेग आणि ओघ पूर्णपणे वेगळा आहे. कुठेतरी सुरूवातीपासून वास्तवाला घट्ट धरून असलेली कथा पुढे जाताना मात्र कल्पिताच्या खेळात अधिक रमली आहे. दशावताराचा संदर्भही पुढे फक्त बाबुलीपुरताच मर्यादित राहतो. ‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ या दोन्ही चित्रपटांचे विषय आणि त्याअनुषंगाने लोककलेची सांगड घालत केलेले सादरीकरण हे सारखेच आहे. मात्र, ‘दशावतार’ची कथामांडणी उत्तरार्धात व्यावसायिक चित्रपटांच्या धाटणीची होत गेल्याने चित्रपटाचा प्रभाव आपसूकच मर्यादित झाला आहे. अर्थात, तांत्रिक मांडणी आणि मूळ कथाविषय दोन्हींच्या वेगळेपणाबरोबरच दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या नटश्रेष्ठाला घेऊन रंगवलेला बाबुली हे चित्रपटाचे मर्मस्थान ठरले आहे. दशावतारी नट हा रात्रीचो राजा असता असं म्हटलं जातं. रात्री रंगणाऱ्या खेळात चेहऱ्याला रंग लावून परकाया प्रवेश केलेल्या या नटाचा आवेश, त्याचं हरवून जाणं आणि त्याच्या वेडातून जिवंत होणारं नाट्य दिलीप प्रभावळकर यांनी जितक्या ताकदीने उभं केलं आहे. त्याच सहजतेने त्यांनी हाफमॅड म्हणून हिणवला जाणारा बाबुली, माधवचा प्रेमळ बाप, संकटाच्या वेळी दशावतारातील प्रसंग आठवून सुटकेचा मार्ग मिळाल्यावर चमकणारे त्यांचे डोळे अशा विविध छटा खूप सहजतेने रंगवल्या आहेत. त्यांना माधवच्या रुपात सिध्दार्थ मेनननेही उत्तम साथ दिली आहे. त्याला अधिक वाव मिळायला हवा होता, असं वाटत राहतं. महेश मांजरेकर, सुनील तावडे, रवी काळे, अभिनय बेर्डे, विजय केंकरे या सगळ्यांनीच त्यांच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा वेगळी व्यक्तिरेखा उत्तमपणे साकारली आहे. प्रियदर्शिनीला पहिल्यांदाच नायिकेच्या पलिकडे जात काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली आहे, तिनेही त्या भूमिकेला न्याय दिला आहे. उत्तम कथा, निर्मितीमूल्यं, मांडणी, तांत्रिक सफाई आणि दमदार कलाकारांच्या अभिनयाने रसिक दंग होतील असा हा ‘दशावतारा’चा खेळ रंगला आहे.

दशावतार

दिग्दर्शक – सुबोध खानोलकर

कलाकार – दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिन इंदलकर, महेश मांजरेकर, सुनील तावडे, रवी काळे, अभिनय बेर्डे, विजय केंकरे.