अभिनेत्री कंगना रणौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद संपण्याचे नाव घेत नाहीये. दिल्ली महिला आयोगाने अभिनेत्री कंगना रणौतच्या १९४७ मधील स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून अभिनेत्रीचा पद्मश्री सन्मान काढून घेण्याची मागणी केली आहे. यासोबतच स्वाती मालीवाल यांनी आपल्या पत्रात कंगनाचा पद्मश्री परत घेऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी विनंती केली आहे.

कंगना रणौतच्या विधानामुळे वाद निर्माण झाला असून अनेकांनी तिचा पद्मश्री परत घेण्याची मागणी केली. दिल्ली महिला आयोगाच्या (डीसीडब्ल्यू) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून कंगना रणौतचा पद्मश्री परत घेण्याची विनंती केली. “ही पहिलीच वेळ नाही. कंगनाला पुरस्कारांची नाही उपचाराची गरज आहे. ती (कंगना रणौत) सवयीने तिच्याच देशातील लोकांविरुद्ध विष ओतते आणि ज्यांच्याशी ती सहमत नाही त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी वारंवार अपमानास्पद भाषा वापरते,” असे स्वाती मालीवाल म्हणाल्या.

“अभिनेत्रीचे विधान महात्मा गांधी, भगतसिंग आणि देशासाठी प्राण अर्पण करणार्‍या आमच्या महान स्वातंत्र्यसैनिकांबद्दलचा तिचा द्वेष दर्शवते. आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदान आणि हौतात्म्याने आपल्या देशाला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले हे आपण सर्व जाणतो. कंगना रणौत यांच्या विधानांनी लाखो भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्या देशद्रोही स्वभावाच्या आहेत,” असे पत्रात म्हटले आहे.

“इतिहासाचे ज्ञान कमी असल्यामुळे अशा लाजिरवाण्या चुका होतात”; वर्षा गायकवाड यांची कंगनावर टीका

“ब्रिटिश राजवट आणि त्यानंतर झालेल्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी जालियनवाला बागेत जमलेल्या हजारो लोकांना आपण कसे विसरू शकतो? आपल्या इतिहासातील ही प्रकरणे ‘भीख’ आहेत का?, असा सवाल स्वाती मालीवाल यांनी आपल्या पत्रातून विचारला आहे. कंगनाचे वागणे देशातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्तकर्त्याला शोभणारे नाही, असे म्हणत स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपती कोविंद यांना तिचा पद्मश्री मागे घेण्याची विनंती केली आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवर कंगना रणौतला तिच्या टिप्पणीबद्दल फटकारले आहे.

“हा पुरावा आहे हिमाचलचे लोकसुद्धा कंगना आणि भाजपाला पसंत करत नाही याचा”; बॉलिवूड अभिनेत्याची टीका

“कंगना रणौत ही अशी महिला आहे जिला गांधी भगतसिंग यांचे हौतात्म्य विनोद वाटतो आणि कोट्यवधी लोकांच्या बलिदानाने मिळालेले स्वातंत्र्य, जणू भीक मागितल्यासारखे वाटते! तिला पुरस्काराची नव्हे तर उपचाराची गरज आहे! मी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे की रणौत यांचा पद्मश्री परत घेतल्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात यावी,” असे स्वाती मालीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रणौतने एका कार्यक्रमात उधळली. कंगनाने टाइम्स नाऊच्या एका समिटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत, “सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणार हे माहित होतं. मात्र भारतीयांकडूनच भारतीयांवर वार होणार नाही हे ध्यानात ठेवायला हवं. स्वातंत्र्यासाठी नक्कीच त्यांचं मोलाचं योगदान आहे. मात्र ते स्वातंत्र्य नव्हतं ती भीक होती. जे स्वातंत्र्य मिळालं ते २०१४ सालामध्ये मिळालं” असे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केले होते.