अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. मागील काही दिवसांपासून अयोध्येत या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. यासाठी अवघी अयोध्यानगरी सजली. त्यामुळे सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत ही एकच चर्चा रंगली आहे. अशातच ‘रामायण’ या मालिकेत सीता हे पात्र सकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी पोस्ट करत आनंद व्यक्त केला.

दीपिका यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी हातात पणती घेतली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी सर्व भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे असे म्हटले आहे.

यापूर्वी अरुण गोविल यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला होता. त्यांनी भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाणार आहे असे म्हटले आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली होती. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले आहे. यावर अनेक कालाकार आपल्या प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला.

मंदिराचे प्रारूप

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच राम मंदिराच्या प्रारूपाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. हे मंदिर तीन मजली असून १६१ फूट उंच असेल. मंदिराच्या मूळ आराखडय़ात बदल करण्यात आला असून आता मंदिराचा आकार व उंची दुपटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक भक्तांना एकाच वेळी रामाचे दर्शन घेता यावे यादृष्टीने हा बदल करण्यात आला आहे.