सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोनचे नाव आघाडीवर आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बी टाऊनमध्ये आजवर अनेक चित्रपटांतून विविध धाटणीच्या भूमिका साकारणारी दीपिका सध्या तिच्या हॉलिवूड पदार्पणामध्ये व्यग्र आहे. दीपिकाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘xXx : द रिर्टन ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाचा आणखी एक टिझर पोस्ट केला आहे. यासोबतच तिने चित्रपटाचा एक पोस्टरही शेअर केला आहे.
दीपिका ‘xXx : द रिर्टन ऑफ झेंडर केज’ या चित्रपटामध्ये सेरेना उनगेरच्या भूमिकेत झळकणार आहे. तिने शेअर केलेल्या या टिझरमध्ये दीपिकाची घायाळ करणारी अदा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. या टिझरच्या केंद्रस्थानी दीपिकाच असल्यामुळे एका नव्या अवतारात ती प्रेक्षकांमोर आली आहे. या अॅक्शनपटाद्वारे दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रमाणेच सध्या दीपिकाच्या चाहत्यांचा आकडाही वाढत आहे. दीपिकाचा पहिला वहिला हॉलीवूड चित्रपट तो ही हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विन डिझेल सोबत, त्यामुळे दीपिकाच काय पण तिचे जगभरातील तमाम चाहतेसुद्धा तिच्या या चित्रपटाची वाट बघत आहेत.
तिने साकारलेले अॅक्शन सिन, डायलॉग डिलिव्हरी आणि चित्रपटातील तिचा लूक सर्वकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. भारतात ‘xXx : द रिर्टन ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी दीपिका आणि विन डिझेलच्या फोटोवरुन चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. खुद्द दीपिकाने विनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिने शेअर केलेल्या फोटोंना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. दरम्यान सध्या हॉलिवूडपटामुळे चर्चेत असणारी दीपिका संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात साकारऱ्या ‘पद्मावती’ या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.