‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ असे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्याने तिने अनेकांना भूरळ घातली आहे. चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या दीपिकाचा समावेश जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये तिने वरचं स्थान पटकावलं आहे.

दीपिकासोबतच या यादीमध्ये एंजोलिना जोली, ब्लेक लाइवली, स्कारलेट जॉनसन, बेयोंसे एम्मा वॉटसन आणि हाले बेरी यांच्या नावाचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या मेट गाला २०१९ मध्ये दीपिकाने हजेरी लावली आहे. यावेळी तिच्या कपड्यांची प्रचंड चर्चा रंगली होती. त्यानंतर तिने डे कान्स २०१९मध्येही हजेरी लावत अनेकांना घायाळ केलं होतं.

दरम्यान, दीपिकाने २०१८ साली अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर ही जोडी अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. विशेष म्हणजे दीप-वीर लवकरच ’83’ या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करणार आहेत. ’83’ हा चित्रपट भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून सध्या या चित्रपटाचं लंडनमध्ये चित्रीकरण सुरु आहे.