‘रांझणा’ या हिंदी चित्रपटापासूनच धनुषने त्याची छाप प्रेक्षकांवर पडायला सुरुवात केली होती. आता धनुष हा केवळ दाक्षिणात्य चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नसून तो आता हॉलिवूडमध्येसुद्धा महत्वाच्या भूमिका करू लागला आहे. मध्यंतरी त्याने हॉलिवूडचा ‘द ग्रे मॅन’ या चित्रपटात महत्वाची भूमिका केली आहे, याबरोबरच तो प्रादेशिक चित्रपटातसुद्धा झळकतो आहे. गेल्या काही दिवसातील धनुषचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नसले तरी त्याचे चाहते त्याच्या एका बहुचर्चित बायोपिकची वाट बघत आहेत.

दिग्गज संगीतकार व संगीत सम्राट म्हणून ओळखले जाणारे इलयाराजा यांच्या बायोपिकमध्ये धनुष त्यांची भूमिका साकारणार आहे. नुकतंच या चित्रपटाची घोषणा झालेली असून याचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. खुद्द इलयाराजा, उलगनायगन कमल हासन व धनुष यांच्या उपस्थितीमध्ये हा पोस्टर अनावरण सोहळा पार पडला. कमल हासन यांच्या हस्ते हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

आणखी वाचा : रणवीर सिंगच्या ‘डॉन ३’चं चित्रीकरण लांबणीवर पडणार; नेमकं कारण जाणून घ्या

आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचं संगीत खुद्द इलयाराजाच देणार आहेत. याच पोस्टर लॉंचदरम्यान त्यांनी हे सरप्राइज चाहत्यांना दिलं. धनुष याने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून याबद्दल पोस्ट करत माहिती दिली. अरुण माथेस्वरन हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान धनुष मीडियाशी संवाद साधताना म्हणाला, “आपल्यापैकी कित्येकांनी लहानपणी इलयाराजा यांची गाणी झोपताना ऐकली असतील, पण इलयाराजा यांच्यासारखा अभिनय करायचाय या विचारानेच माझी रात्रीची झोप उडाली आहे. दोन बायोपिकमध्ये काम करावं ही माझी प्रबळ इच्छा होती एक इलयाराजा यांचा बायोपिक अन् दूसरा रजनीकांत यांचा बायोपिक. यापैकी एक स्वप्न सत्यात उतरतंय अन् याचा मला अभिमान आहे.”

धनुष आणि इलयाराजा यांचे चाहते या चित्रपटाची फार आतुरतेने वाट बघत आहेत. अद्याप याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नसून हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. इलयाराजा यांनी ७००० गाणी संगीतबद्ध केली असून १००० हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे, याबरोबरच तब्बल २०००० हून अधिक लाईव्ह शोजमध्ये त्यांनी गाणी सादर केली आहेत. त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. २०१२ मध्ये त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे.