‘शोले’ चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि बॉक्स ऑफिसवर विक्रम रचला. हा चित्रपट ५० वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला होता. अलीकडेच ‘शोले’ला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त धर्मेंद्र चित्रपटाबद्दल बोलले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, हा धर्मेंद्र यांचा नेहमीचा आवडता चित्रपट नाही. धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दल अनेक गुपिते उघड केली आहेत. धर्मेंद्र यांनी सांगितले की ‘सत्यकाम’ आणि ‘शोले’ हे त्यांचे आवडते चित्रपट नाहीत; परंतु ‘प्रतिज्ञा’ हा त्यांचा नेहमीचा आवडता चित्रपट आहे.

धर्मेंद्र काय म्हणाले?

दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा धर्मेंद्र यांना विचारण्यात आले की ‘शोले’च्या यशाने त्यांना आश्चर्यचकित केले का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. १९७५ मध्ये जेव्हा ‘शोले’ प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या दोन महिने आधी माझा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याबद्दल कोणीही बोलत नाही. हा चित्रपट दुलाल गुहा यांचा ‘प्रतिज्ञा’ होता, जो मला सर्वांत जास्त आवडतो. मला एका ट्रक ड्रायव्हरची भूमिका करायची होती, जो पोलिस बनतो. ही भूमिका खूपच कठीण होती, ज्यामध्ये खूप भावना आणि ड्रामा होता. ते एक आव्हान होते आणि लोकांना त्यात मी आवडलो.”

ते पुढे म्हणाले, ‘शोले’ आणि ‘सत्यकाम’ हे माझे आवडते चित्रपट असले तरी जर आपण माझ्या सर्वकालीन आवडत्या चित्रपटाबद्दल विचाराल, तर तो ‘प्रतिज्ञा’ आहे. हा चित्रपट १९७५ मध्ये ‘शोले’च्याच काळात प्रदर्शित झाला होता. त्यामुळे बहुतेक लोकांच्या तो लक्षात आला नाही. पण, ‘शोले’शी स्पर्धा असूनही ‘प्रतिज्ञा’ सुपरहिट होता. ज्याप्रमाणे ‘नया जमाना’ १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेरा गाव मेरा देश’ या सुपरहिट चित्रपटाबरोबर हिट झाला होता. मला ‘नया जमाना’देखील खूप आवडला.”

जेव्हा धर्मेंद्र यांना विचारण्यात आले की, त्यांना कधी वाटले होते का की, ‘शोले’ त्यांच्या कारकिर्दीतील इतका मोठा टप्पा ठरेल? तेव्हा अभिनेत्याने उत्तर दिले, “नाही, मी कधीच असा विचार केला नव्हता. आम्ही सर्वांनी चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली. त्याचे चित्रीकरण बंगळुरूच्या बाहेरील भागात झाले होते. त्यावेळी तिथे कोणतेही हॉटेल नव्हते. त्यामुळे आम्हाला चित्रीकरणासाठी बंगळुरूपासून ५० किमी अंतरावर प्रवास करावा लागायचा; पण ते खूप मजेदार होते. हेमा तिथे होती आणि जयाही होती.”