बॉलिवूड अभिनेता सनी देओल आपल्या ‘ढाई किलोच्या हाताची’ दहशत केवळ चित्रपटातच दाखवत नाही, तर खऱ्या आयुष्यात सुद्धा अनेकदा त्याला राग अनावर झालाय. सनी देओल त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम करतो आणि जर त्याच्या समोर वडील धर्मेंद्र यांना कुणी काही बोललं की त्याला ते सहन होत नाही आणि मग त्याची तळपायाची आग मस्तकात शिरते. एकदा तर सनी देओलने वडील धर्मेंद्र यांच्या एका मित्रालाच मारण्याचा प्लान आखला होता. धर्मेंद्र यांनी स्वतः हा संपुर्ण किस्सा ‘इंडियन आयडल’च्या सेटवर शेअर केलाय.
हा किस्सा १९६१ मध्ये रिलीज झालेल्या ‘शोला और शबनम’ या चित्रपटाच्या दरम्यानचा आहे. ‘शोला और शबनम’ हा चित्रपट धर्मेंद्र यांच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. पण या चित्रपटातला एक सीन मुलगा सनी देओलला फारसा आवडलेला नव्हता. या सीनवरून सनी देओल नाराज देखील झाला होता. इतकंच नाही तर त्याने धमकी सुद्धा दिली होती. ‘इंडियन आयडल’च्या सेटवर धर्मेंद्र यांनी हा किस्सा सांगताना सनी देओल त्यावेळी खूप लाजाळू आणि रागीट होता, असं देखील सांगितलं.
यावेळी धर्मेंद्र म्हणाले, “सनी लहान होता तेव्हापासूनच त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो दोन वर्षाचा असताना त्याने एक असं काम केलं होतं, ते ऐकून सर्वच जण हैराण होतील. माझा चित्रपट ‘शोला और शबनम’ जेव्हा रिलीज झाला, या चित्रपटात एम. राजन मला मारतानाचा एक सीन आहे. ही गोष्ट सनीला आवडली नाही. राजन माझा खूप चांगला मित्र होता आणि तो मला भेटण्यासाठी घरी आला होता. एम. राजनला पाहिल्यानंतर सनीला खूप राग आला होता. तो घराच्या बाहेर अतिशय रागात फेऱ्या मारताना मी पाहिलं. मी जेव्हा त्याला काय झालं म्हणून विचारलं, त्यावेळी सनी म्हणाला, त्याने तुम्हाला मारलं होतं, मग आता मी त्याला मारणार.”
यावेळी हा किस्सा पुढे सांगताना धर्मेंद्र म्हणाले, “मी त्यावेळी सनीला समजावलं की बेटा तो चित्रपट होता, त्यात असं करावं लागतं. एम. राजन माझा खूप चांगला मित्र आहे. खूप समजावल्यानंतर सुद्धा सनीला राग शांत होत नव्हता. त्यानंतर कसंबसं सनीचा राग शांत केला. त्याचा लहान भाऊ बॉबीच्या बाबतीत सुद्धा तो खूप हळवा आहे. सनीच्या समोर बॉबीला कोणी ओरडू शकत नव्हता.”