सध्या देशात आणि राज्यात करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे पुणे आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मास स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यावरून चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यानं टीका केली आहे. एका युझरनं यासंबंधी काही फोटो ट्विट केले होते. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे पुण्यानंतर मुंबईतही स्वयंसेवकांकडून मास स्क्रिनिंग करण्यात आलं हे टीकाकारांनी पाहावं,” अशा आशयाचं ट्विट एका युझरनं केलं होतं.

यावर अनुराग कश्यपनं पुन्हा ट्विट करत टीका केली आहे. “जर हीच पीपीई किट्स पोलीस, डॉक्टर्स आणि नर्सेसना दिली असती तर संघाला आपला गणवेश बदलण्याची गरज भासली नसती,” अशी टीका अनुराग कश्यपनं केली आहे. “जर तुम्हाला रिस्किंग लाईफ पाहायची असेल तर जे लोक अनवाणी रस्त्यांवर निघाले आहेत त्यांच्याकडे पाहा. प्रचाराची पण एक मर्यादा आहे,” असंही त्यानं नमूद केलं.

यानंतर अनेक युझर्सनं त्याच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. काही युझर्सनं सरकारवर निशाणा साधला. तर काही जणांनी अनुराग कश्यपवरही टीका केली. “तुम्ही कोणत्याही चांगल्या कामाची प्रशंसा करू शकत नाही,” अशी प्रतिक्रियाही एका युझरनं दिली.