Disha Patani : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर ११ सप्टेंबर रोजी रात्री गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशातील बरेलीतील सिव्हिल लाईन्स परिसरात ही घटना घडली होती. या घटनेनंतर या प्रकरणातील हल्लेखोरांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. दरम्यान, यात या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस चकमकीत दोन संशयित हल्लेखोरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने मंगळवारी गाझियाबाद येथील ट्रोनिका सिटी परिसरात केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या चकमकीत दिशा पटानीच्या बरेली येथील घरावरील गोळीबार प्रकरणात सहभागी असलेल्या दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, रवींद्र उर्फ कल्लू आणि अरुण असं या चकमकीत मृत्यू झालेल्या संशयित हल्लेखोरांचं नाव आहे. हे दोन्ही गुन्हेगार रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीतील सक्रिय सदस्य होते. ११ सप्टेंबर रोजी रात्री पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात वापरलेल्या मोटारसायकलवरून त्यांचा माग काढण्यात आला. दरम्यान, दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाई दरम्यान चकमक झाली. या चकमकीत दोन्ही गुन्हेगार गंभीर जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी एका निवेदनात ही माहिती दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
दिशा पटानीच्या वडिलांनी काय आरोप केले होते?
गोळीबाराच्या घटनेबाबत एफआयआर दाखल करण्यात आला होता आणि यामध्ये अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांनी अनेक गंभीर आरोप केले होते. हल्लेखोरांचं लक्ष्य दिशा पटानीचे वडील जगदीश पटानी होते असा आरोप त्यांनी केला होता अशी माहिती काही वृत्तांमधून समोर आली होती.
माध्यमांतील वृत्तानुसार, ११ सप्टेंबर रोजी रात्री दिशा पटानीच्या घराबाहेर झालेला गोळीबार हा त्यांच्या वडिलांना लक्ष्य करून करण्यात आला होता. जगदीश पटानी यांनी सांगितलं की, “१२ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांच्या पाळीव कुत्र्यांनी भुंकण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना झोपेतून जाग आली. तेव्हा त्यांना घराबाहेर दोघेजण दिसले. यावेळी त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात? यावेळी एका हल्लेखोराने म्हटलं की मार दो इसे. त्यानंतर त्यातील एकाने बंदूक काढून गोळीबार केला. पण त्यानंतर जगदीश पटानी यांनी बाल्कनीच्या खांबामागे लपून स्वतःला वाचवलं.”