Emma Thompson on Donald Trump: ऑस्कर पुरस्कार प्राप्त अभिनेत्री एमा थॉम्पसन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका चित्रपट महोत्सवात सहभागी झाल्या असता त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, माझा घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी मला डेटवर येण्यासाठी फोन केला होता. ६६ वर्षीय ब्रिटिश अभिनेत्री थॉम्पसन यांनी या प्रसंगाची आठवण सांगताना गमतीत म्हटले, “जर तेव्हा होकार दिला असता तर आज मी अमेरिकन इतिहास बदलू शकले असते.” विशेष म्हणजे सेलिब्रिटी सलमा हायेकनेही अशाचप्रकारचा दावा काही दिवसांपूर्वीच केला होता.
सलमा हायेकलाही डेटसाठी विचारणा
विशेष म्हणजे हॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी सलमा हायेक यांनी अशाच प्रकारचा दावा केला होता. सलमा हायेक म्हणाल्या होत्या की, माझा बॉयफ्रेंड असतानाही ट्रम्प यांनी मला डेटबाबत विचारणा केली होती. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्यानंतर थॉम्पसन यांनीही ट्रम्प यांच्याबाबतची आठवण सांगितली.
द टेलिग्राफने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. एमा थॉम्पसन म्हणाल्या की, माझा पती केनेथ ब्रॅनाघशी घटस्फोट झाला त्याच्यानंतर लगेचच ट्रम्प यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, १९९८ साली राजकीय व्यंगावर आधारित विनोदी चित्रपट ‘प्रायमरी कलर्स’चे चित्रीकरण सुरू होते. मी माझ्या व्हॅनमध्ये असताना फोन वाजला.
डोनाल्ड ट्रम्प फोनवर म्हणाले…
फोन उचलल्यानंतर पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले, ‘हॅलो, मी डोनाल्ड ट्रम्प बोलतोय’. मला वाटले कुणीतरी प्रँक करत आहे. ‘मी तुमची कशाप्रकारे मदत करू शकते’, असे मी म्हणाले. त्यावर पलीकडून त्यांनी म्हटले, ‘तुम्ही माझ्या एका सुंदर निवासस्थानी यावे, तिथे कदाचित आपण एकत्र जेवण करू, अशी माझी इच्छा आहे.’ थॉम्पसन पुढे म्हणाल्या की, मी त्यांच्या प्रस्तावाला कोणतेही उत्तर न देता म्हटले, “हे खूप छान आहे. धन्यवाद. मी तुमच्याशी नंतर बोलेन.”
थॉम्पसन पुढे म्हमाल्या की, मला नंतर कळले की, तो फोन खरोखरंच डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. तेही त्यांची पहिली पत्नी मार्ला मॅपल्सपासून नुकतेच वेगळे झाले होते. त्यामुळे त्यांची टीम त्यांच्यासाठी एक छानसा जोडीदार शोधत होती. मी पैजेवर सांगू शकते की, त्यांच्याकडे एक चांगली जोडीदार शोधून देण्यासाठी त्यावेळी टीम असणार.
जर ट्रम्प यांचा प्रस्ताव स्वीकारला असता तर, या प्रश्नावर बोलताना थॉम्पसन म्हणाल्या की, जर असे झाले असते तर मी कदाचित अमेरिकन इतिहास बदलू शकले असते आणि माझ्याकडे सांगण्यासारखी एक छान गोष्ट असती.