एकता कपूर एका नव्या वेबसीरीजला घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेबसीरीज इंदिरा गांधीपासून प्रेरित असेल असं एकताने शेअर केलेल्या एका पोस्टवरुन वाटत आहे. एकताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली आहे.

अल्ट बालाजी या प्रॉडक्शन हाऊसची नवी वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “ही वेळ आहे खटला २ची. जनता विरुद्ध इंदिरा गांधी. कौतुकास्पद त्याचबरोबर टीकेसही पात्र असलेली ही महिला. एक महत्त्वकांक्षी कथा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Erkrek (@ektarkapoor)

यासोबतच तिने दोन पुस्तकांची मुखपृष्ठेही शेअर केली आहेत- द केस दॅट शूक इंडिया आणि इमर्जन्सी रिटोल्ड. आणीबाणीच्या कालखंडातली ही गोष्ट असल्याचा अंदाज यावरुन लावता येईल.

खटल्यांवर आधारित वेबसीरीजच्या मालिकेतील ही दुसरी वेबसीरीज ठरणार आहे. २०१९ साली नानावटी प्रकऱणावर आधारित वेबसीरीज प्रदर्शित झाली होती. ‘द व्हर्डिक्ट- स्टेट व्हर्सेस नानावटी’ असं या सीरीजचं नाव असून यात मानव कौल, सुमीत व्यास, एली अवराम, अंगद बेदी आणि कुब्रा सईत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते.

अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वीच ती एका चित्रपटात इंदिरा गांधीची भूमिका करणार असल्याचं जाहीर केलं होतं. विद्या बालननेही सांगितलं होतं ही ती पूर्व पंतप्रधानांची भूमिका साकारणार आहे. मात्र, त्यानंतर त्यासंदर्भात कोणतीही गोष्ट समोर आली नाही. तर २०१७ साली प्रदर्शित झालेला मधुर भांडारकरचा ‘इंदू सरकार’ हा चित्रपट आणीबाणीवर आधारित होता. त्याच्यामुळे बरीच कॉन्ट्रोव्हर्सीही झाली होती.