करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहे. त्यातच लॉकडाउन असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी समाजातील गरजूंना आर्थिक मदत करत आहेत. तसंच काही जण त्यांना जेवणही पूरवत आहेत. यामध्येच आता कलाविश्वातील एका स्टारकिडने तिच्या मदतीचा हात पुढे केला आहे. विशेष म्हणजे ही स्टारकिड अवघ्या १२ वर्षांची असून तिने चित्रकलेच्या माध्यमातून ७० हजार रुपये जमा केले आहेत. हे पैसे ती मुक्या जनावरांसाठी देणार आहे.

फराह खानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. फराहची मुलगी आन्या १२ वर्षांची असून तिने पाच दिवसांमध्ये ७० हजार रुपये जमा केले आहेत. विशेष म्हणजे आन्याने प्राण्यांचे चित्र काढले असून एका चित्रासाठी तिने एक हजार रुपये घेतले आहेत.

“माझी १२ वर्षाची मुलगी आन्याने ५ दिवसांमध्ये ७० हजार रुपये जमा केले. तिने काही पाळीव प्राण्यांचे चित्र रेखाटले होते. तिने एक चित्र १ हजार रुपयांना विकलं आहे. चित्र काढून तिने जमा केलेले ७० हजार रुपये ती प्राण्यांच्या मदतीसाठी वापरणार आहे. या पैशातून ती प्राण्यांसाठी खाद्य पुरवणार आहे. ज्यांनी ज्यांनी आन्याचे चित्र खरेदी केले त्या सगळ्याचे आभार”, अशी पोस्ट फराहने शेअर केली आहे.

दरम्यान, फराहने ही पोस्ट शेअर केल्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी आन्याचं कौतूक केलं. रितेश देशमुख, दिया मिर्झा, रेणुका शहाणे, हंसल मेहता, रॉनित रॉय आणि नील नितीन मुकेश या कलकारांनी फराह खानचा व्हिडीओ शेअर केला असून आन्याचं कौतूक केलं आहे.