‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्यास कारणीभूत ठरलेल्या पाकिस्तानी कलाकार फवाद खान याला ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीचे नामांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आणि आमिर खानच्या ‘दंगल’मधील धाकड मुलींसह ‘अलिगढ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या मनोज वाजपेयी याच्याकडे दुर्लक्ष झाले असताना पाकिस्तानी कलाकाराला स्था मिळाले आहे. फवाद खान याला साहाय्यक कलाकाराच्या वर्गवारीमध्ये स्थान नामांकन मिळाले.

मागील वर्षात पार पडलेल्या ‘गोल्डन पुरस्कार, स्टारडस्ट पुरस्कार आणि स्टार स्क्रिन पुरस्कारामध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘कपूर अॅण्ड सन्स या चित्रपटातील फवादच्या भूमिकेला महत्त्व देण्यात आले नव्हते. या पुरस्कारामध्ये फवाद खानला कोणत्याही वर्गवारीत स्थान मिळवता आले नाही. करण जोहर यांच्या बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये फवाद खानची भूमिका ही फारच छोटी होती. पण कपूर अॅण्ड सन्स’मध्ये त्याची भूमिका जास्त वेळाची होती. करण जोहर यांच्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे करणने त्याच्या चित्रिकरणाचा भाग वाढविला असल्याची देखील चर्चा रंगली होती. मात्र आता ‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपटातील साहय्यक कलाकाराच्या भूमिकेसाठी नामांकन मिळाल्यानंतर तो पुरस्कारावर कब्जा करणार का? हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. फवाद खान व्यतिरिक्त पाकिस्तानी गायक देखील फिल्मफेअर पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. यामध्ये राहत फत्तेह अली खान यांना ‘सुलतान’ चित्रपटातील ‘जग घुमिया..’ या गाण्यासाठी तर कुरायत उल अनी बलुच ‘पिंक’ चित्रपटातील ‘करी करी’ आणि अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ चित्रपटातील ‘तेरे संग यारा…’ या गाण्यासाठी अतिफ अस्लम यांना नामांकन मिळाले आहे.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या फिल्मफेअर पुरस्काराच्या नामांकन यादीमध्ये ‘दंगल’ चित्रपटातील अभिनयाबद्दल आमिर खानला नामांकन मिळाले आहे. तर महानायक अमिताभ यांची ‘पिंक’ चित्रपटासाठी या गटात वर्णी लागली आहे. ‘सुलतान’ चित्रपटासाठी सलमान खान आणि ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी शाहिद कपूर याला पसंती मिळाली असून भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूतला नामांकन देण्यात आले आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला नामांकन मिळाले नसल्यामुळे या पुरस्कारावर नेटीझन्सनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.